अहिंसक कृतीतून चार गावांचा दारूबंदीचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:18 AM2018-11-30T00:18:18+5:302018-11-30T00:18:44+5:30
तालुक्यातील बोरमपल्ली, व्यंकटापूर व बामणी येथील गाव संघटनांची कार्यशाळा बामणी येथे २८ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. छुप्या मार्गाने होत असलेल्या दारूविक्रीला आळा घालण्यासाठी अहिंसक कृतींवर भर देण्याचा निर्णय उपस्थित महिलांनी यावेळी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील बोरमपल्ली, व्यंकटापूर व बामणी येथील गाव संघटनांची कार्यशाळा बामणी येथे २८ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. छुप्या मार्गाने होत असलेल्या दारूविक्रीला आळा घालण्यासाठी अहिंसक कृतींवर भर देण्याचा निर्णय उपस्थित महिलांनी यावेळी घेतला. तीनही गावांतील ७० महिला कार्यशाळेला उपस्थित होत्या.
मुक्तिपथ गाव संघटनेच्या प्रयत्नातून बोरमपल्ली, व्यंकटापूर व बामणी या तीनही गावांमध्ये ठराव घेऊन दारूविक्री बंद केली आहे. असे असले तरी छुप्या मार्गाने विक्रेते दारूची विक्री करीत आहेत. यावर अंकुश आणण्यासाठी आवश्यक उपायांवर कार्यशाळेत तालुका मुक्तिपथ चमूने मार्गदर्शन केले. काहीच दिवसांपूर्वी बोरमपल्ली येथे गाव संघटनेच्या महिलांनी मोहसडवा व इतरही दारूसाठा नष्ट केला होता. सोबतच महिला ग्रामसभा घेऊन यापुढे दारू विक्री करताना कुणी आढळल्यास त्यावर दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. कार्यशाळेत त्यांनी ही माहिती दिली. गावातील दारूविक्री थांबविण्यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने अहिंसक कृतीवर भर देणार असल्याचे बामणी व व्यंकटापूर येथील गाव संघटन सदस्यांनी सांगितले. गावात होत असलेल्या दारूविक्रीचा सर्वाधिक त्रास हा महिलांना सहन करावा लागतो. त्यामुळे दारूविक्री बंद होण्यासाठी महिलांनीच पुढे येण्याची गरजही गाव संघटनेच्या सदस्यांनी बोलून दाखविली. संपूर्ण गावातील महिलांना संघटीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.