दारू व खर्राविक्री बंदीचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:05 AM2018-11-23T00:05:28+5:302018-11-23T00:10:04+5:30
खर्रा आणि दारूची विक्री बंद करण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील सूरजागड इलाक्यातील ७२ गावांतील गाव संघटनांची बैठक बुधवारी गट्टा येथे पार पडली. या बैठकीत गावांतून दारूविक्री पूर्णत: बंद करणे तसेच खर्रा विक्रीची दुकाने बंद करण्यासह इतरही अनेक विषयांवर चर्चा झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : खर्रा आणि दारूची विक्री बंद करण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील सूरजागड इलाक्यातील ७२ गावांतील गाव संघटनांची बैठक बुधवारी गट्टा येथे पार पडली. या बैठकीत गावांतून दारूविक्री पूर्णत: बंद करणे तसेच खर्रा विक्रीची दुकाने बंद करण्यासह इतरही अनेक विषयांवर चर्चा झाली.
तालुक्यातील जांभिया, मोडूस्के, पुरसलगोंदी, हेड्री, वांगेतुरी, मर्दाकुही, देवपायली ही गावे वगळता इलाक्यातील इतर गावांना अद्याप दारूविक्री बंदी साध्य करता आलेली नाही. या गावांना दारूबंदी साध्य करण्यासाठी तसेच बंदी असलेल्या गावांना ती टिकविण्यासाठी काय प्रयत्न करता येतील यावर बैठकीत चर्चा झाली. सर्वच गावे आदिवासीबहुल असल्याने गावठी दारू मोठ्या प्रमाणात गाळली जाते. परंतु काही जण या दारूची विक्री करतात. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर अंकुश आणण्यासाठी गावांमध्ये संपूर्ण दारूबंदीचा ठराव घेणे आवश्यक आहे. याबाबत बैठकीत चर्चा झाली. अनेक गावांनी हा ठराव घेण्याची तयारी दर्शविली.
दारूमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. याची माहिती मुक्तिपथ चमूंनी लोकांना सांगितली. दारूमुळे गावांचे सामाजिक आरोग्यही बिघडत आहेत. बहुतेकांचा मूळ व्यवसाय शेती आणि शेतमजुरी आहे. हातात खूप पैसा नसतोच. त्यामुळे असलेला थोडा पैसाही दारूत गेल्याने लोकांचेच आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्याचबरोबर अनेक जण खर्रा खाताना आढळतात. आदिवासी समाजात पूजेसाठी खर्रा मुळीच चालत नाही. त्यामुळे दारूसोबतच गावांतून खर्राविक्री बंद करण्यासाठी ठराव घेणार असल्याचे अनेक पदाधिकाºयांनी सांगितले. बैठकीला गट्टाचे पोलीस पाटील कन्ना गोटा, भूमैया रामू गोटा, दर्देवाडा येथील भूमैया सैनू महा, बोदूरचे पोलीस पाटील कुल्ले कोवारे यांच्यासह ७२ गावांतील गाव संघटनेचे सदस्य तसेच अनेक गावांचे पोलीस पाटील, भूमैया उपस्थित होते. बैठकीसाठी मुक्तिपथ तालुका चमूने सहकार्य केले.
‘पोलो’ ठेवून घेणार दारूविक्री बंदीचा ठराव
जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये साप्ताहिक सुटीप्रमाणे ‘पोलो’ ठेवण्याची प्रथा प्रचलित आहे. प्रत्येक गावाचा दिवस वेगवेगळा असतो. या दिवशी गावातील सर्वच लोक शेतावर न जाता सुटी घेऊन घरीच थांबतात. दारू आणि खर्रा बंदीसाठी ‘पोलो’ ठेवण्याचा निर्णय यावेळी अनेक गावांनी घेतला. तसेच पोलो असलेल्या दिवशी दारू व खर्रा बंदीचा ठराव घेणार असल्याचेही सांगितले.
सूरजागड यात्रा तंबाखूमुक्त करणार
एटापल्ली तालुक्यातील सूरजागड येथे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठाकूरदेवाची यात्रा भरते. आदिवासी समाजात या यात्रेला फार महात्त्व आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर लागूनच असलेल्या बस्तर भागातील आदिवासी मोठ्या संख्येने यात्रेत दाखल होतात. दारू व तंबाखूमुक्तीचा संदेश नागरिकांपर्यत पोहोचविण्यासाठी ही यात्रा तंबाखू व खर्रा मुक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ग्रामस्थांनी या इलाका बैठकीत सांगितले.