वैरागडातील हेमांडपंथी मंदिर उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:36 AM2018-11-12T00:36:09+5:302018-11-12T00:36:43+5:30
गोरजाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत महादेव तलावाच्या पाळीवर हेमांडपंथी मंदिर आहे. सदर मंदिराच्या देखभाल व दुरूस्तीकडे पुरातत्व विभाग व स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने सदर मंदिर कोसळले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : गोरजाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत महादेव तलावाच्या पाळीवर हेमांडपंथी मंदिर आहे. सदर मंदिराच्या देखभाल व दुरूस्तीकडे पुरातत्व विभाग व स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने सदर मंदिर कोसळले आहे.
हेमांडपंथी मंदिर हे पुरातन शिल्पकलेचा अजोड नमूना आहे. दगडांवर अतिशय सुरेख चित्र कोरण्यात आले आहेत. शेकडो वर्षांपूर्वी या मंदिराचे बांधकाम झाले. सदर मंदिराला ५० वर्षांपासून पडझड सुरू झाली. त्याचवेळी पुरातत्व विभागाने लक्ष घालून डागडुजी करून आवश्यक होते. मात्र पुरातत्व विभागाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी आजच्या स्थितीत मंदिराचा बहुतांश भाग कोसळला आहे. दगड तेवढे शिल्लक आहेत.
एकीकडे शासन पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत. मात्र जुना इतिहास व जुने आठवणी असलेल्या इमारती नष्ट होत आहेत. स्थानिक नागरिकांनी मंदिराच्या दुरूस्तीबाबत अनेकवेळा निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे. मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याचा धोका आहे. वैरागड येथे या हेमांडपंथी मंदिरासह किल्ला व इतर अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या वास्तू नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे अधिकाºयांनी लक्ष देणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधीनींही शासनाकडे पाठपुरावा करून निधी खेचून आणण्याची मागणी आहे.