जिल्ह्यातील कृषी तंत्रज्ञान विकसित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:27 AM2018-11-18T01:27:42+5:302018-11-18T01:29:05+5:30
जिल्ह्यात कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी करावयांच्या उपाययोजनांबाबत पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या नवनियुक्त कार्यकारी परिषद सदस्य स्नेहा हरडे यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयात भेट देऊन पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी करावयांच्या उपाययोजनांबाबत पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या नवनियुक्त कार्यकारी परिषद सदस्य स्नेहा हरडे यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयात भेट देऊन पाहणी केली.
यावेळी शासकीय कृषी महाविद्यालय नागपूरचे प्राचार्य डॉ.एन. पालार्वार, यशोदीप संस्थेचे अध्यक्ष अरुण हरडे, सहाय्यक कुलसचिव डॉ. चव्हाण, डॉ. गावंडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात दोन कृषी महाविद्यालय असून या माध्यमातून शेतीबहूल असलेल्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी आपल्या कृषी पदवी अभ्यासक्रमातून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज लक्षात घेऊन स्नेहा हरडे यांनी नागपूर शासकीय महाविद्यालयातील विविध क्षेत्राचा आढावा घेतला. यावेळी प्रशासकीय भवन, वर्गखोल्या, परीक्षा खोल्या, इंग्रजकालिन वाचनालय, वर्कशॉप, प्रयोगशाळा, कॉन्फरन्स हॉल आदींची माहिती अवगत केली. विशेष म्हणजे, १९०६ मध्ये इंग्रजांनी देशात पाच शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन केले होते. त्यात नागपूर येथील महाविद्यालयाचा समावेश होता. या महाविद्यालयात इंग्रज राणी व्हिक्टोरिया हिच्या आगमनाप्रित्यर्थ व्हिक्टोरिया टेक्नीकल इंस्टिट्युट सायंटिफिक लायब्ररीची स्थापना करण्यात आली होती. या लायब्ररीत अनेक पुरातन अवलोकनार्थ पुस्तके उपलब्ध आहेत. या पुस्तकाचा आजही विदेशी तरुण लाभ घेतात. या लायब्ररीत असलेल्या पुस्तकांविषयी स्नेहा हरडे यांनी माहिती अवगत करून घेतली. तसेच इंग्रज राजवटीत देशामध्ये आढळणाऱ्या विविध वनस्पती, कीटक, मध व इतर वस्तुंचे संकलन या ठिकाणी जतन करून ठेवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने देश स्वातंत्र्य झाला त्यावर्षीचे मध, १९४८ ची राणीमाशी, विविध प्रकारचे फुलपाखरू आदी संग्रहित आहेत. असे संकलन जिल्ह्यात धानपिकांवर आढळणारे विविध कीटकांचे करण्याचा मानस असून पशुपालनातून होणारी क्रांतीसुद्धा महत्त्वाची असल्याने आगामी काळात दोन्ही महाविद्यालयात अशा योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प कार्यकारी परिषद सदस्य स्नेहा हरडे यांनी केला आहे.