पुलाअभावी रखडला १० गावांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:52 PM2019-05-22T23:52:59+5:302019-05-22T23:53:29+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून एटापल्लीची ओळख आहे. या तालुक्यात मूलभूत सोयीसुविधा अद्यापही पोहोचल्या नाही. नागरिक वीज, पाणी, रस्ते, पूल आदींपासून वंचित आहेत. तालुक्यातील बांडिया नदीवर अनेक वर्षांपासून अद्यापही पुलाचे बांधकाम न झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना ये-जा करता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून एटापल्लीची ओळख आहे. या तालुक्यात मूलभूत सोयीसुविधा अद्यापही पोहोचल्या नाही. नागरिक वीज, पाणी, रस्ते, पूल आदींपासून वंचित आहेत. तालुक्यातील बांडिया नदीवर अनेक वर्षांपासून अद्यापही पुलाचे बांधकाम न झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना ये-जा करता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो.
बांडिया नदी परिसरात दोन्ही बाजूला दहा पेक्षा अधिक गावे आहेत. या गावातील नागरिकांना दोन्ही बाजूला ये-जा करावी लागते. दिवाळीपासून उन्हाळ्यापर्यंत नदीतून ये-जा करणे शक्य होते. परंतु पावसाळ्यात नदीतून पाणी वाहत असल्याने आवागमन करता येत नाही. तालुक्यातील कुदरी, मोहुर्ली, हेटलकसा, वेलमगल, पिपली, बुरगी, जिजावंडी, इरपनारसह अन्य दोन गावातील नागरिकांना ये-जा करताना अडचणी येतात. या गावातील नागरिकांना बांडिया नदी ओलांडून विविध कामांकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. मागील अनेक वर्षांपासून बांडिया नदीवर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
एटापल्ली तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक नागरिक छत्तीसगड येथे विविध वस्तू खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. बांडिया नदीवर पुलाचे बांधकाम झाल्यास छत्तीसगड राज्यात पुन्हा व्यवसाय वाढू शकते. तसेच दोन्ही राज्यातील नागरिकांसाठी सोयीचे होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी नवीन उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या मागणीची दखल घेण्याची गरज आहे.
गरजेच्या वस्तूंची व्यवस्था
पावसाळ्यात नागरिकांना तीन महिने पुरेल ऐवढ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू पावसाळ्यापूर्वीच खरेदी करून न्याव्या लागतात. विशेष म्हणजे, पावसाळ्यात पुरांमुळे या परिसरातील विद्यार्थी एटापल्ली येथे शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकत नाही. त्याबरोबरच रूग्णांची प्रकृती बिघडल्यास त्यांना एटापल्ली येथे उपचारासाठी आणता येत नाही. गरजेच्या वस्तूंची व्यवस्था आधीच करून ठेवावी लागते.