बौद्धधम्माच्या आचरणातून सर्वांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:10 AM2018-04-30T01:10:26+5:302018-04-30T01:10:26+5:30
तथागत गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्धधम्मात अनेक चांगल्या बाबींचा समावेश असून या धम्माच्या आचरणातून सर्वांचा विकास शक्य आहे, असा सूर उपस्थित मान्यवरांनी काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तथागत गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्धधम्मात अनेक चांगल्या बाबींचा समावेश असून या धम्माच्या आचरणातून सर्वांचा विकास शक्य आहे, असा सूर उपस्थित मान्यवरांनी काढला.
रविवारी कोरची येथे बौद्ध समाजाच्या वतीने बौद्धधम्म व्याख्यानमालेचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम सकाळी १०.३० वाजता बाजार चौकातील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर नवीन बुद्धभूमीच्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून माल्यार्पण करण्यात आले. त्रिशरण, पंचशील त्रिरत्न वंदना घेऊन पूजा झाली. यानंतर नागपूर येथील व्याख्याते धम्मचारी प्रज्ञाचंद्र, धम्मचारी आर्यकीर्ती, धम्मचारी करुणासागर यांनी जगाला बुद्धाची गरज का आहे, याविषयी मार्गदर्शन करून जगण्याचा मार्ग काय व कसे जगायचे याबाबत माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धधम्म का स्वीकारला, यासाठी त्यांनी काय केले, याबाबत माहिती दिली. बौद्ध धम्माचे माहात्म्य सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बौद्ध व्याखनमालेचा कार्यक्रम घेण्यात आला. बौद्ध धम्माच्या गीतांवर सांस्कृतिक नृत्य आणि गाणी सादर करण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेकडोच्या संख्येने बौद्धवासी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन कोरचीचे नगराध्यक्ष नसरुद्दीन भामानी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी बौद्ध महासभा संस्थेचे सचिव श्रावण अंबादे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक मनोज अग्रवाल, भाजपचे कोरची तालुकाध्यक्ष आनंद चौबे, समता सैनिक दल नागपूरचे राष्टÑीय महासचिव जी. वासुदेव, चुनारकर, कोरचीचे नगरसेवक हिरा राऊत, नगरसेविका हर्षलता भैसारे, राधेश्याम साखरे, माणिक साखरे, गौतम अंबादे, ओमराव टेभुर्णे, चंद्रशेखर अंबादे, राहुल अंबादे, महेश लाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक देवराव गजभिये यांनी मानले.
यशस्वीतेसाठी कोरची येथील बौद्ध समाज मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच बांधवांनी सहकार्य केले. याप्रसंगी कोरची शहरासह नजीकच्या गावातील बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.