किन्हाळाचा विकास रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:42 AM2017-10-25T00:42:24+5:302017-10-25T00:42:36+5:30
गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दोन्ही गावांना पुराचा फटका बसत होता. या गावाचे १९९४ रोजी पुनर्वसन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दोन्ही गावांना पुराचा फटका बसत होता. या गावाचे १९९४ रोजी पुनर्वसन करण्यात आले. ही दोन्ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
किन्हाळा व अरततोंडी ही गावे गाढवी नदीच्या जवळ सखल भागात वसली होती. या गावांमध्ये गाढवी नदीच्या पुराचे पाणी शिरत होते. परिणामी दरवर्षी येथील नागरिकांना दुसºया ठिकाणी विस्थापीत व्हावे लागत होते. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने आर्थिक हानी होत होती. १९९४ मध्ये ही दोन्ही गावे पुराच्या तडाख्यात सापडली होती. त्यावर्षी या दोन्ही गावांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर या दोन्ही गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या गावांचे पाच किमी अंतरावरील मोहटोला व चिखली रिठ या आबादी जागेत पुनर्वसन करण्यात आले. ज्या वेळेवर नागरिकांचे पुनर्वसन झाले. त्या वेळेवर शासनाने रस्ते, नाल्या आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु निकृष्ठ दर्जाचे काम झाल्याने या सुविधा अल्पावधीतच नेस्तनाभूत झाल्या. आजच्या स्थितीत या दोन्ही गावांमध्ये रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. किन्हाळा गावच्या नाल्या पूर्णपणे खचल्या आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र दिसून येते. पावसाळ्यात ही समस्या गंभीर होते. पुनर्वसीत गावांना मूलभूत सोयीसुविधा मिळणे गरजेचे असताना या दोन्ही गावांना वंचित ठेवले जात आहे. किन्हाळा या गावाप्रमाणेच अरततोंडी गावाचे चिखली रिठ येथील आबादी जागेत पुनर्वसन झाले. परंतु जुन्या अरततोंडी गावातील अर्धे अधिक नागरिक आजतागायत नवीन पुनर्वसीत ठिकाणी आलेले नाहीत. फक्त मिळालेल्या नवीन जागेवर त्यांनी कब्जा करून ठेवला आहे. रेशनपासून तर शाळेपर्यंतच्या सुविधांबाबत हे गाव द्विधा स्थितीत आहे. नागरिक दोन ठिकाणी राहत असल्याने सोयीसुविधा पुरविताना अडचण जात आहे. सोयी सुविधांचा अभाव असल्याने या दोन्ही गावातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.