किन्हाळा व अरततोंडीचा विकास रखडला

By admin | Published: May 29, 2017 02:26 AM2017-05-29T02:26:22+5:302017-05-29T02:26:22+5:30

गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दोन्ही गावांना पुराचा फटका बसत होता.

The development of kinhaala and arthanthi stops | किन्हाळा व अरततोंडीचा विकास रखडला

किन्हाळा व अरततोंडीचा विकास रखडला

Next

पुनर्वसित गावे : अरततोंडीत दोन ठिकाणी सुविधा पुरविण्यास प्रशासनाची होत आहे दमछाक
पुरूषोत्तम भागडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दोन्ही गावांना पुराचा फटका बसत होता. या गावाचे १९९४ रोजी पुनर्वसन करण्यात आले. किन्हाळा गाव पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसित झाले आहे. मात्र अरततोंडी गाव अर्धे अधिक जुन्याच ठिकाणी आहे. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास अडचण निर्माण होत असल्याने ही दोन्ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
किन्हाळा व अरततोंडी ही गावे गाढवी नदीच्या जवळ सखल भागात वसली होती. या गावांमध्ये गाढवी नदीच्या पुराचे पाणी शिरत होते. परिणामी दरवर्षी येथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी विस्थापीत व्हावे लागत होते. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने आर्थिक हानी होत होती. १९९४ मध्ये ही दोन्ही गावे पुराच्या तडाख्यात सापडली होती. त्यावर्षी या दोन्ही गावांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर या दोन्ही गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या गावांचे पाच किमी अंतरावरील मोहटोला व चिखली रिठ या आबादी जागेत पुनर्वसन करण्यात आले. ज्या वेळेवर नागरिकांचे पुनर्वसन झाले. त्या वेळेवर शासनाने रस्ते, नाल्या आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु निकृष्ठ दर्जाचे काम झाल्याने या सुविधा अल्पावधीतच नेस्तनाभूत झाल्या. आजच्या स्थितीत या दोन्ही गावांमध्ये रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. किन्हाळा गावच्या नाल्या पूर्णपणे खचल्या आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र दिसून येते. पावसाळ्यात ही समस्या गंभीर होते. पुनर्वसीत गावांना मूलभूत सोयीसुविधा मिळणे गरजेचे असताना या दोन्ही गावांना वंचित ठेवले जात आहे.
किन्हाळा या गावाप्रमाणेच अरततोंडी गावाचे चिखली रिठ येथील आबादी जागेत पुनर्वसन झाले. परंतु जुन्या अरततोंडी गावातील अर्धे अधिक नागरिक आजतागायत नवीन पुनर्वसीत ठिकाणी आलेले नाहीत. फक्त त्यांच्या नावाने मिळालेल्या नवीन जागेवर त्यांनी कब्जा करून ठेवला आहे. रेशनपासून तर शाळेपर्यंतच्या सुविधांबाबत हे गाव द्विधा स्थितीत आहे. एकाच गावातील नागरिक दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याने सोयीसुविधा पुरविताना अडचण जात आहे. पावसाळ्यापूर्वी नालीचा उपसा होणे आवश्यक आहे. मात्र अजूनपर्यंत नाल्यांचा उपसा केल्या गेला नाही. चिखली रिठ येथे झालेल्या पुनर्वसनामुळे आबादीधारक भूमिहिन झाले आहेत. अरततोंडी येथील जमीन सुपीक असल्याने तेथील नागरिक गाव सोडण्यास तयार नाही.

पुनर्वसन न झालेल्यांकडून जागा परत घेण्याची मागणी
अरततोंडी येथील सर्वच नागरिकांना चिखली रिठ येथील आबादी जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे अनेक कास्तकार भूमिहिन झाले. मात्र अरततोंडी येथील अर्धेच नागरिक चिखली रिठ येथे घर बांधून वास्तव्यास आहेत. अर्धे नागरिक जुन्या अरततोंडी येथेच आहेत. मात्र या नागरिकांनी चिखली रिठ येथे शासनाने दिलेल्या जागेवर आपला कब्जा अजुनही कायम ठेवला आहे. ते नागरिक येण्यास तयार नसतील तर त्यांच्याकडील जागा परत घेऊन ती जुन्या आबादीधारक कास्तकाराला परत देण्याची मागणी होत आहे.
अरततोंडी व चिखली रिठ या दोन्ही गावांसाठी एकच शाळा आहे. या ठिकाणी १ ते ४ पर्यंत वर्ग आहेत. एकच शाळा दोन्ही ठिकाणी भरविली जाते. एक शिक्षक जुन्या अरततोंडी येथे तर एक शिक्षक चिखली रिठ येथे शिकवत आहे.

Web Title: The development of kinhaala and arthanthi stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.