गावगणराज्यातूनच गावाचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:05 PM2018-01-28T22:05:51+5:302018-01-28T22:06:39+5:30
प्रत्येक माणसात देव आहे. घराघरात देव आहे हे जर आपण मानत असू तर कुठे नतमस्तक झाले पाहीजे याचे भान ठेवले पाहीजे. माणसाच्या दु:ख, वेदना दूर करण्यासाठी धाऊन आलं नाही तर पुण्य मिळणारच नाही, असे सांगत ग्रामगीतेची कास धरा,......
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रत्येक माणसात देव आहे. घराघरात देव आहे हे जर आपण मानत असू तर कुठे नतमस्तक झाले पाहीजे याचे भान ठेवले पाहीजे. माणसाच्या दु:ख, वेदना दूर करण्यासाठी धाऊन आलं नाही तर पुण्य मिळणारच नाही, असे सांगत ग्रामगीतेची कास धरा, म्हणजे आपलं गावच सर्व तीर्थ आहे हे समजून येईल, अशी भावना परिसंवादातून मान्यवरांनी मांडली.
कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य गावगणराज्य साहित्य नगरी (मेंढा-लेखा) येथे रविवारी झालेल्या पंधराव्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनात ‘तुझं गावच नाही का तिर्थ, बाबा रिकामा कशाला फिरतं’ या आणि ‘गावचे राज्य गावचि करी, कोणाचीच न चाले हुशारी, आमुचे आम्हीच सर्वतोपरी, नांदू गावी’ या दोन विषयांवर परिसंवाद झाले.
पहिल्या परिसंवादात नत्थुजी भुते गुरूजी (उमरी, जि.भंडारा), प्रा.मिलिंद सुपले (ब्रह्मपुरी) व माणिक दुधलकर (चंद्रपूर) यांनी तर दुसºया परिसंवादात प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर (कुरखेडा), चंदू पाटील मारकवार (आदर्श गाव राजगड, चंद्रपूर) व माजी आमदार हिरामण वरखेडे यांनी सहभाग घेतला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मोहन हिराबाई हिरालाल होते. संचालन रवी मानव यांनी केले.
यावेळी बोलताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक नत्थूजी भुते म्हणाले, तुकारामदादांनी उमरी येथील ग्रामरक्षक दलाचे काम माझ्याकडे दिले होते. ग्रामसभेच्या अधिकाराचा वापर करताना वैनगंगेच्या रेतीघाटावर आम्ही हक्क सांगितला. गावात काही करण्यापूर्वी ग्रामसभा अध्यक्षाची परवानगी घ्यावी, अशी भूमिका गावकºयांनी घेतली. गावकºयांच्या सहकार्यातूनच तंटामुक्त गाव, हागणदारीमुक्त गाव, स्मार्ट व्हिलेज असे विविध पुरस्कार उमरी गावाने पटकाविले. ग्राम स्वराज्याच्या कल्पनेमुळे अवघ्या १५ वर्षात गावाने मोठी प्रगती केली, असे ते म्हणाले.
प्रा. मिलींद सुपले म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातले मेंढा-लेखा हे गाव नक्षलग्रस्त गाव म्हणूनच ओळखले जात होते. मात्र तुकारामदादांच्या प्रेरणेने देवाजी तोफा यांनी ग्राम स्वराज्याचे बीज पेरले. हे कार्य आता देशभर पसरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सर्वाेदय मंडळ चंद्रपूरचे संस्थापक माणिक दुधलकर म्हणाले, पुण्याचा संचय करायचा असेल तर प्रत्येक माणूस सुखी होईल, यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येकाने चांगला नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावले तरी प्रत्येक गाव तीर्थस्थान झाल्याशिवाय राहणार नाही. आपण संविधानाच्या अधिकारांच्या गोष्टी करतो मात्र आपल्या कर्तव्याचे भान ठेवत नाही. तीर्थस्थानासाठी वनवन फिरण्यापेक्षा गावाच्या विकासासाठी मेहनत घेतली तर जास्त समाधान मिळेल, असे ते म्हणाले.
परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोपात मोहन हिराबाई हिरालाल म्हणाले, गांधी, विनोबा, जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून काम करू शकेल, अशा गावाच्या शोधात मेंढा-लेखा येथे आलो. येथे बहुमताने नाही तर एकमताने निर्णय घेणे सुरू केले. राष्ट्रसंतांनी जी माणुसकीची शिकवण दिली त्यातूनच हे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन मोहन हिराबाई हिरालाल यांनी केले.
झाडाखालील खुला मंच ठरला वैैशिष्ट्य
या संमेलनासाठी मेंढा-लेखा ग्रामसभेच्या कार्यालयासमोर चिंचेच्या झाडांखाली असलेल्या ओट्यांवर खुला मंच साकारण्यात आला. श्रोत्यांसाठी समोर चटईसोबतच खुर्च्या आणि खाटाही टाकल्या होत्या. त्यामुळे बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत आपल्या सोयीने आसनस्त झाले होते. विशेष म्हणजे, गडचिरोली व धानोरा येथील महाविद्यालयीन युवक-युवतींचाही श्रोते म्हणून चांगला सहभाग होता. औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावातून आलेले संमेलनाध्यक्ष भाष्कर पेरे पाटील यांचे स्वागत गावाच्या वेशीवरच करण्यात आले. आदिवासींचे पारंपारिक ढोल वाजवत पाहुण्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत आणण्यात आले. वाहनांच्या पार्किंगपासून ते श्रोत्यांना पाणी वाटण्यापर्यंतची सर्व कामे युवकच करीत होते.