स्वयंरोजगारातून होणार नागरिकांसह गावांचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:38 AM2018-03-22T01:38:03+5:302018-03-22T01:38:03+5:30
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ व्या बटालियनच्या वतीने नक्षलप्रभावित धानोरा तालुक्यातील नागरिकांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने सिव्हिक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत ....
ऑनलाईन लोकमत
धानोरा : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ व्या बटालियनच्या वतीने नक्षलप्रभावित धानोरा तालुक्यातील नागरिकांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने सिव्हिक अॅक्शन कार्यक्रमांतर्गत रेशीम उत्पादन प्रशिक्षणास धानोरा येथे सुरूवात झाली आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ बुधवारी धानोरा येथे झाला. या प्रशिक्षणात एकूण ४० लाभार्थ्यांचा समावेश आहे.
सदर प्रशिक्षणाच्या शुभारंभाप्रसंगी सीआरपीएफ ११३ बटालियनचे द्वितीय कमान अधिकारी के. डी. जोशी, सहायक कमांडंट रोहतास कुमार, रेशम उत्पादन विभागाचे सहायक निर्देशक, आर. टी. जगदांडे, रेशीम उत्पादन विभाग अधिकारी गणेश राठोड, समाजसेवक देवाजी तोफा, धानोराचे वन परिक्षेत्राधिकारी आर. एच. चौधरी, वन परिक्षेत्राधिकारी एन. आर. हेमके, डॉ. कुंदन एस. दुफारे, पोलीस उपनिरिक्षक राजेश माळी, अतुल नवले, हिंमत सरगर, क्षेत्र सहायक पुष्पा चवथे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर प्रशिक्षण १५ दिवस चालणार आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना देवाजी तोफा म्हणाले, नागरिकांनी पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. पैशाचा सदुपयोग करून वाईट सवयींपासून दूर राहा. आसाममध्ये कोसा तयार करून त्यापासून कापड बनविण्याचे उद्योग सुरू झाले आहे. अशाच पध्दतीने जिल्ह्यात रेशीम उद्योग उभारल्यास रोजगार निर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सीआरपीएफचे जवान उपस्थित होते.