गडचिरोली नगर परिषदेतील विकास कामे मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:59 PM2019-07-17T22:59:56+5:302019-07-17T23:00:31+5:30
गडचिरोली शहरातील बहुप्रतीक्षित विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामे मार्गी लागण्याची आशा बळावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरातील बहुप्रतीक्षित विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामे मार्गी लागण्याची आशा बळावली आहे.
गडचिरोली नगर परिषदेच्या विविध कामांसाठी भरीव निधी देण्याची मागणी याआधीच मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मंगळवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, भाजपचे जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची मुंबईत भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रस्ताव तत्काळ मार्गी लावून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
राज्य सरकारचा कार्यकाळ संपण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत. निवडणुकीची आचारसंहिता दीड महिन्यात लागणार आहे. त्यामुळे शक्य तितकी कामे मंजूर करून निधी देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका घेत आहे. आता ही कामे कधी मार्गी लागतील आणि त्याचा गडचिरोलीकरांना कधी लाभ घेता येईल, याकडे शहरवासियांचे लक्ष राहणार आहे.
असे आहेत कामांचे प्रस्ताव
शहरातील प्रस्तावित कामांमध्ये गडचिरोली नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीकरिता २५ कोटी, शहर सौंदर्यीकरण व रस्ते विकास कामासाठी १५ कोटी, शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेकरीता ४५ कोटी रु पये आणि नवीन नाट्यगृहासाठी २० कोटी रुपये दिले जाणार आहेत.
घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर पंचायतींना निधी
स्वच्छ भारत अभियानांतर्गत एटापल्ली, भामरागड, चामोर्शी, अहेरी नगर पंचायती व आरमोरी नगर परिषदेला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी)च्या धरतीवर महाराष्ट्र शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अभियानांतर्गत शहरे हागणदारीमुक्त करणे व घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छता राखणे, घनकचरा व्यवस्थापन करणे या दोन मुख्य घटकांचा समावेश आहे.
१ मार्च २०१९ रोजी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या बैठकीत १२३ नगर पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन नमुना प्रकल्पाच्या अहवालास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार नगर पंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये एटापल्ली नगर पंचायतीला ७८ लाख, भामरागड नगर पंचायतीला ६८.९६ लाख, चामोर्शी नगर पंचायतीला ९५.७६ लाख, अहेरी नगर पंचायतींला १०४.८३ लाख, आरमोरी नगर परिषदेला १३६.२५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारावा, असे निर्देश संबंधित नगर पंचायती व नगर परिषदांना देण्यात आले आहे.