आरमोरीतील देवकुले परिवार चार पिढ्यांपासून गाठींच्या व्यवसायात
By Admin | Published: March 11, 2017 01:32 AM2017-03-11T01:32:19+5:302017-03-11T01:32:19+5:30
शहरातील कुंभार मोहल्ल्यातील विमल वसंतराव देवकुले यांचा परिवार मागील चार पिढ्यांपासून साखरगाठी व्यवसाय करीत आहे.
होळीनिमित्त मागणी वाढली : महाशिवरात्रीपासून गाठी बनविण्याला होते सुरूवात
आरमोरी : शहरातील कुंभार मोहल्ल्यातील विमल वसंतराव देवकुले यांचा परिवार मागील चार पिढ्यांपासून साखरगाठी व्यवसाय करीत आहे. कोणत्याही रासायनिक द्रव्यांचा वापर गाठी बनविताना केला जात नसल्याने देवकुले परिवाराच्या गाठीला आरमोरी तालुक्यात विशेष पसंती मिळत आहे.
होळीला साखरगाठी देण्याची परंपरा हिंदू धर्मामध्ये आहे. त्यामुळे होळी सणाच्या आठ दिवसांपूर्वीच आठवडी बाजार, शहर व ग्रामीण भागातील दुकाने गाठ्यांनी सजण्यास सुरूवात होतात.प्रत्यक्षात गाठी बनविण्यास महाशिवरात्रीपासूनच सुरूवात होते, अशी माहिती विमल वसंतराव देवकुले यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. दरवर्षी जवळपास १० पोते साखरीच्या गाठी बनविल्या जातात. या गाठींची विक्री आरमोरी, वैरागड आठवडी बाजार तसेच आरमोरी तालुक्यातील लहान-मोठ्या गावातील आठवडी बाजारांमध्ये केली जाते. ५० ते ६० हजार रूपयांच्या गाठींची दरवर्षी विक्री होते. विमल देवकुले, त्यांचा मुलगा अनुप व इतर चार मजुरांच्या मदतीने गाठ्या बनविल्या जातात. (वार्ताहर)
हाताने बनविलेल्या गाठीस आरमोरी तालुकावासीयांची पसंती
गडचिरोली तसेच मोठमोठ्या शहरांमधील दुकानांमध्ये दिसणाऱ्या साखरगाठ्या यंत्राच्या सहाय्याने बनविल्या जातात. गाठी पोकळ व्हावी, त्याचबरोबर दिसण्यासाठी ती आकर्षक असावी, यासाठी गाठीमध्ये रासायनिक द्रव्यांचा वापर केला जातो. मात्र देवकुले परिवार मागील चार पिढ्यांपासून अजूनही पारंपरिक रीतीनेच गाठी बनवित आहे. या गाठीमध्ये रासायनिक पदार्थ टाकले जात नाही. त्यामुळे देवकुले यांच्या गाठीची चव नागपूरच्या गाठीच्या तुलनेत अतिशय चांगली आहे. याचा अनुभव आरमोरी तालुक्यातील नागरिकांना मागील ४० वर्षांपासून आहे. त्यामुळे देवकुले परिवाराचा दुकान आठवडी बाजारामध्ये लागताच ग्रामीण भागातील नागरिकांची गाठी घेण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे चिल्लर विक्री करूनही या व्यवसायातून ५० ते ६० हजार रूपयांची वार्षिक उलाढाल केली जात आहे.