ऐकावं ते नवलच... मनोकामनापूर्तीसाठी चक्क देवीलाच भाविक अर्पण करतात तंबाखू!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 05:48 PM2023-04-08T17:48:12+5:302023-04-08T17:51:41+5:30
अनोखी श्रद्धा : सिरोंचा तालुक्यातील रेडीएलपू देवस्थानातील स्थिती
कौसर खान/ रविकुमार येमुर्ला
सिरोंचा/रेगुंठा (गडचिरोली) : मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक-भक्त प्रार्थना करतात. साकडे घालतात किंवा नवस बाेलतात. ही सर्वसामान्य बाब व्यक्तीच्या दैविक श्रद्धेशी संबंधित असते. कुणी नैवेद्य देतात तर कुणी ओटी भरतात आदी देवाला अर्पण केले जाते; परंतु जर देवी किंवा देवाला कुणी जर चक्क तंबाखू-खर्रा अर्पण करत असेल तर मात्र चर्चा होणारच! असाच भक्तीभाव सिरोंचा तालुक्यातील टेकडा-रेगुंठा मार्गालगत असलेल्या रेडीएलपू देवीच्या बाबतीत गेल्या १०० वर्षांपासून जोपासला जात आहे. या प्रथेची चर्चा अहेरी उपविभागातच नाही तर तेलंगणा राज्यातही आहे.
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ४५ कि.मी. अंतरावर व सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावरून १० कि.मी. अंतरावर टेकडा-रेगुंठा मार्गालगत एका झाडाखाली रेडीएलपू देवीची मूर्ती स्थापित आहे. ही मूर्ती केव्हा स्थापन झाली याबाबत निश्चित माहिती नसली तरी येथून ये-जा करणारे भाविक देवीला तंबाखू अर्पण करण्याची प्रथा गेल्या १०० वर्षांपासून आहे, असे जुने जाणकार सांगतात. विशेष म्हणजे, २५ ते ३० वर्षांपासून सुगंधित तंबाखू व सुपारीपासून तयार होणारा खर्रासुद्धा अर्पण केला जात आहे.
कुंकुमेश्वरच्या भाविकांचेही देवीला साकडे
रेडीएलपू देवीच्या स्थानाच्या पूर्व दिशेला सिरोंचा तालुक्यातील प्रसिद्ध असलेला कुंकूमेश्वर मंदिर आहे. या मंदिरात महादेवाची मूर्ती असून मंदिर २०० मीटर उंच पहाडीवर निसर्गरम्य स्थळी आहे. येथील शिवलिंगसुद्धा १०० वर्षांपासून आहे. शिवलिंगात एक मोठा उखळ आहे. त्यावर पंच अमृताचा अभिषेक करून देवास करुणा भाकल्यास आपली मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची धारणा आहे.