मार्कंडेश्वर मंदिरात भाविकांच्या दर्शनाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 05:00 AM2021-03-14T05:00:00+5:302021-03-14T05:00:37+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेले मार्कंडा देवस्थान अखेर भक्तांसाठी खुले करण्यात आले. मार्कंडेश्वराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने तहसील कार्यालय किंवा मार्कंडा देवस्थान मार्गावरील पोलीस चौकीत आपल्या नावाची नोंदणी करून दर्शनासाठी आपले नाव निश्चित करावे, असे आवाहन आ.डॉ. होळी यांनी भाविकांना केले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मार्कंडादेव : चामाेर्शी तालुक्यातील प्रसिद्ध मार्कंडा देवस्थान शनिवारी भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. दरराेज ५०० भाविकांना टाेकनच्या माध्यमातून दर्शन घेता येणार आहे. हे दर्शन सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम आ.डॉ. देवराव होळी यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेले मार्कंडा देवस्थान अखेर भक्तांसाठी खुले करण्यात आले. मार्कंडेश्वराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने तहसील कार्यालय किंवा मार्कंडा देवस्थान मार्गावरील पोलीस चौकीत आपल्या नावाची नोंदणी करून दर्शनासाठी आपले नाव निश्चित करावे, असे आवाहन आ.डॉ. होळी यांनी भाविकांना केले आहे.
दर्शनासाठी गडचिरोली जिल्ह्यातूनच नव्हे, तर विदर्भाच्या अनेक भागांतून भाविक महाशिवरात्रीला येत असतात. परंतु, यावर्षी प्रशासनाने दर्शनासाठी बंदी घातल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. आ. डॉ. होळी यांनी राज्य शासन व प्रशासनाचा निषेध करीत आंदोलनाचा इशारा दिला होता, त्याचा सकारात्मक परिणाम होऊन प्रशासनाच्या वतीने मंदिर शनिवारी सकाळपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्या अनुषंगाने डॉ. होळी यांनी देवस्थानात प्रथम पूजन करून दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, भाजप तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, जयराम चलाख उपस्थित होते.
राेजगार अन् उत्साह देखील हिरावला
विदर्भात प्रसिध्द असलेल्या मार्कंडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्रीला एकदाच माेठी जत्रा भरते. या परिसरातील छाेटेमाेठे विक्रेते, भाविक व सर्व स्तरातील नागरिक या जत्रेची वर्षभरापासून प्रतीक्षा करीत असतात. पूजा-अर्चेसाेबतच मनाेरंजनही हाेते. मात्र यावर्षी काेराेनाने मार्कंडाची जत्रा रद्द झाली. एकही दुकान लागले नाही. परिणामी राेजगार हिरावला. तसेच उत्साह सुध्दा मावळला.
१३६ भाविकांनी घेतले दर्शन
चामोर्शी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मार्कंडा येथील मार्कंडेश्वर मंदिरात १३ मार्चपासून भाविकांना प्रशासनाकडून टोकन पद्धतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी १३६ भाविकांनी या पद्धतीने मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले. माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनीही दर्शन घेतले. याशिवाय दि.१४ साठी १३७ आणि दि.१५ साठी ३८ टोकनची बुकिंग झाल्याचे चामोर्शी तहसील प्रशासनाने सांगितले. सामान्य भाविकांची भावना लक्षात घेऊन अखेर दररोज टोकन पद्धतीने ५०० भाविकांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.