डीजींनी केली सुरजागडची पाहणी
By admin | Published: December 30, 2016 01:49 AM2016-12-30T01:49:31+5:302016-12-30T01:49:31+5:30
तालुक्यातील सुरजागड पहाडीवर नक्षल्यांनी जवळपास ८० वाहनांना आग लावली होती.
परिस्थितीचा आढावा घेतला : संशयित नागरिकांची ठाण्यात चौकशी सुरू
एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड पहाडीवर नक्षल्यांनी जवळपास ८० वाहनांना आग लावली होती. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या जळीतकांडाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी पोलीस उपमहानिरिक्षक शिवाजी बोडखे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजाराममूर्ती, सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरजागड पहाडीवर येणार असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ट्रक जाळपोळ प्रकरणाचा तपास एटापल्लीचे एसडीपीओ नितीन जाधव करीत आहेत. त्यांनी घटनास्थळाला २४, २५, २६ व २८ डिसेंबर रोजी भेट देऊन चौकशी केली. यामध्ये ७७ ट्रक, तीन जेसीबी असे एकूण ८० वाहने जळाली आहेत. या घटनेमध्ये माओवादी नेता नर्मदाक्का, जोगन्ना भास्कर, साईनाथ रामको, कोवा उसेंडी, गोंगलू यांच्यासह विविध दलममध्ये सहभागी असलेल्या नक्षल्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तपास अधिकारी एसडीपीओ नितीन जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. ज्या नागरिकांवर संशय आहे. अशांना पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी केली जात आहे. ठाकूर ट्रान्सपोर्टचे ५० ट्रक असल्याची माहिती जाधव यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)