मंत्रिपदाने तामझाम वाढला; पण धर्मरावबाबांपुढे आव्हानांचा डोंगर
By संजय तिपाले | Published: July 7, 2023 03:27 PM2023-07-07T15:27:06+5:302023-07-07T15:30:47+5:30
रोजगारासह आदिवासींच्या उत्थानाची अपेक्षा : जुन्या- नव्या कायकर्त्यांची बांधावी लागेल मोट
संजय तिपाले
गडचिरोली : राज्यातील सत्तानाट्यात अवचित मंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्याने धर्मरावबाबा आत्राम यांचा तामझाम पुन्हा वाढला आहे. मंत्री झाल्यावर दि. ७ जुलैला तेे पहिल्यांदाच जिल्ह्यात येत आहेत. समर्थकांमध्ये अच्छे दिन आल्याचे चित्र आहे, पण धर्मरावबाबांच्या आगामी राजकीय वाटचालीत आव्हानांचा डोंगर असणार आहे. शरद पवार यांच्या विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना थोपविण्यासह आदिवासींचे रखडलेले प्रश्न तसेच रोजगारनिर्मितीसह मूलभूत विकासकामे करताना त्यांचा कस लागणार आहे.
तब्बल पाच दशकांच्या सक्रिय राजकारणाचा अनुभव गाठीशी असलेल्या धर्मरावबाबा आत्राम यांची मंत्रिपदाची चौथी टर्म आहे. त्यांना आता लोकसभेचे वेध लागले आहेत, तर त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांना विधानसभेत जायचे आहे. मंत्रिपदातून ते खासदारकी व आमदारकीसाठी पायवाट निर्माण करतील, असे सांगितले जाते. मात्र, सत्तानाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दोन गटांत विभागले गेले आहेत. धर्मरावबाबा वयाने बुजुर्ग आहेत, अजित पवार यांच्याकडे तरुण कार्यकर्त्यांचा ओढा आहे. अशावेळी धर्मरावबाबा तरुणाईला कशी साद घालतात, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.
शरद पवारांवरील निष्ठेचे शपथपत्र व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत यांनी दि. २ जुलै रोजीच शरद पवार यांना समर्थन जाहीर केले आहे. दुसरीकडे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश टाकसांडे यांचे शरद पवार यांच्याविषयी निष्ठा असल्याचे १०० रुपयांच्या मुद्राकांवरील शपथपत्र समाजमाध्यमात व्हायरल झाले आहे. देसाईगंजचे तालुकाध्यक्ष क्षितीज उके यांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा पाठवला आहे. मोदी-शहांविरोधात आपली भूमिका राहिलेली आहे. आता भाजपसोबत सत्तेत जाणे मनाला न पटणारे आहे, अशी खंत त्यांनी राजीनाम्याच्या पत्रात व्यक्त केली आहे. शेवटच्या स्तरावरील कार्यकर्ते अजूनही संभ्रमात असल्याचे सांगितले जाते. शरद पवार यांना मानणाऱ्या अशा निष्ठावंतांना धर्मरावबाबा कसे समजावणार? हा प्रश्न आहे.
वनउपजावर आधारित हवेत प्रकल्प
जिल्ह्यात वनउपज मोठ्या प्रमाणात आहेत. आदिवासींचे जीवनमान यावर अवलंबून आहे. त्यामुळे वनसंपत्तीवर आधारित प्रक्रिया उद्योग तसेच नवे प्रकल्प आणणे गरजेचे आहे. हाताला काम व शाश्वत रोजगार मिळाला तरच आदिवासींचे उत्थान शक्य आहे. शिवाय दुर्गम, अतिदुर्गम भागात शिक्षण, आरोग्यासह रस्ते, पक्की घरे अशा मूलभूत सुविधा पोहोचणेही आवश्यक आहे. विशेष म्हणजे, सत्ताधाऱ्यांच्या हाती केवळ एक वर्षाचा अवधी आहे.
सत्काराला काय उत्तर देणार...
धर्मरावबाबा आत्राम हे दि. ७ जुलै रोजी नागपूरहून गडचिरोलीत येतील. दुपारी १ वाजता गडचिरोलीच्या सीमेवरील देसाईगंजच्या वैनगंगा नदीपुलावर त्यांचे आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जंगी स्वागत करणार आहेत. देसाईगंज, आरमोरीनंतर पोर्ला येथील सत्कार स्वीकारून तेे सायंकाळी पाच वाजता गडचिरोलीत पोहोचतील. इंदिरा गांधी चौकात त्यांचा सत्कार होणार आहे. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर व रायुकॉंचे लीलाधर भरडकर यांनी सांगितले. सत्काराच्या उत्तरात धर्मरावबाबा काय भावना व्यक्त करतात, याकडे लक्ष आहे.