धुळेपल्लीवासीयांनी पुन्हा जमा केल्या तीन बंदुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:45 AM2018-11-10T00:45:21+5:302018-11-10T00:45:50+5:30
तालुक्यातील धुळेपल्ली येथील ग्रामस्थांनी २९ आॅक्टोबर रोजी तीन भरमार बंदुका पोलिसांकडे परत केल्या होत्या. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा तीन भरमार बंदुका पोलिसांकडे जप्त केल्या आहेत. ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या पोलीस अधिकारी व जवानांनी धुळेपल्लीवासीयांसोबत यावर्षीची दिवाळी साजरी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील धुळेपल्ली येथील ग्रामस्थांनी २९ आॅक्टोबर रोजी तीन भरमार बंदुका पोलिसांकडे परत केल्या होत्या. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा तीन भरमार बंदुका पोलिसांकडे जप्त केल्या आहेत.
ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या पोलीस अधिकारी व जवानांनी धुळेपल्लीवासीयांसोबत यावर्षीची दिवाळी साजरी केली. धुळेपल्लीवासीयांना फराळ व कपड्यांचे वितरण करण्यात आले. ताडगावचे प्रभारी अधिकारी समीर दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल नामदे, महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम गोरे, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक यांनी धुळेपल्ली गावातील नागरिकांशी संवाद साधून हत्यार बाळगणे बेकायदेशिर असून शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.
गावात एखाद्या व्यक्तीकडे शस्त्र असल्याची गावाची शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात आणून दिली. शस्त्र सोडून शिक्षणाच्या मागे लागा, आपल्या पाल्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन रोजगार मिळविण्यासाठी सक्षम करा, असे आवाहन केले. पोलिसांच्या या आवाहनाला गावातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा तीन भरमार बंदुका पोलिसांकडे जप्त केल्या.