डिझेलच्या तुटवड्याने सारेच त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:45 PM2018-06-18T22:45:49+5:302018-06-18T22:46:05+5:30
गडचिरोली शहरासह तालुक्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या गावांमध्ये पेट्रोल व डिझेलपंप आहे. मात्र जिल्ह्यातील सर्वच पंपावर डिझेलचा तुटवडा रविवारी सायंकाळपासून निर्माण झाला आहे. पंपावर येऊनही डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर व चारचाकी वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरासह तालुक्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या गावांमध्ये पेट्रोल व डिझेलपंप आहे. मात्र जिल्ह्यातील सर्वच पंपावर डिझेलचा तुटवडा रविवारी सायंकाळपासून निर्माण झाला आहे. पंपावर येऊनही डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर व चारचाकी वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
सध्या खरीप हंगामाच्या पेरणीचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी लवकर पेरणीचे काम आटोपण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. मात्र हे ट्रॅक्टर चालविण्यासाठी डिझेल मिळत नसल्याने सोमवारी अनेकांच्या पेरण्या खोळंबल्या. गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह अनेक ठिकाणच्या ट्रॅक्टर डिझेलअभावी उभ्या होत्या. सोमवारी गडचिरोली शहरासह अनेक ठिकाणी लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र डिझेल न मिळाल्याने नवरदेवाकडील वºहाडी मंडळी दोन ते तीन तास विलंबाने लग्नस्थळी पोहोचले. परिणामी वºहाड्यांना त्रास सहन करावा लागला.
डिझेलवर चालणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर व इतर चारचाकी वाहनांचे वाहतूक काही प्रमाणात मंदावली होती. पेट्रोल महाग झाल्याने अनेक शासकीय व निमशासकीय नोकरदारांनी डिझेलवर चालणाºया कार खरेदी केल्या आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेक नोकरदारांना बाहेरगावी जायचे होते. मात्र कित्येकजणांना कारमध्ये टाकण्यासाठी डिझेल न मिळाल्याने त्यांना आपला दौरा रद्द करावा लागला. डिझेल तुटवड्यासंदर्भात गडचिरोली येथील एका पेट्रोलपंपावर चौकशी केली असता, कंपन्यांमध्ये डिझेलचा तुटवडा आहे. वरिष्ठपातळीवरूनच गडचिरोली जिल्ह्यात डिझेलचा पुरवठा झाला नाही. सोमवारी रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत डिझेलचा टँकर गडचिरोलीत पोहोचणार असल्याची माहिती मिळाली असल्याचे सांगण्यात आले.
तुटवड्याची चौकशी करा- भडांगे
रविवारी सायंकाळपासून गडचिरोली जिल्ह्याच्या एकाही पंपावर वाहनधारकांना डिझेल मिळाले नाही. ट्रॅक्टरच्या सहाय्याने होणारे शेतातील नांगरणी व पेरणीचे काम थांबले आहे. डिझेलचा तुटवडा कसा निर्माण झाला, याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे पदाधिकारी तथा ग्राहक कल्याण परिषेदचे विदर्भ अध्यक्ष चंद्रशेखर भडांगे यांनी केली आहे.