ठेंगण्या पुलाने वाट अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:04 AM2019-08-11T00:04:26+5:302019-08-11T00:05:09+5:30
सिरोंचा तालुक्यातील पातागुडम परिसरातील सोमनपल्ली नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात नेहमी पाणी राहत असल्याने परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून आसरअल्ली हे गाव गाठावे लागते. या नाल्यामुळे परिसरातील सुमारे १० गावांचा संपर्क तुटतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील पातागुडम परिसरातील सोमनपल्ली नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात नेहमी पाणी राहत असल्याने परिसरातील नागरिकांना जीव धोक्यात घालून आसरअल्ली हे गाव गाठावे लागते. या नाल्यामुळे परिसरातील सुमारे १० गावांचा संपर्क तुटतो.
पातागुडम परिसरात सोमनपल्ली, कोपेल्ला, कोर्लामाल, रमेशगुडम, देचलीपेठा, झिंगानूर, पातागुडम, रायगुडम व पेंड्याला या दहा गावाच समावेश होतो. या परिसरातील आसरअल्ली हे सर्वात मोठे गाव आहे. त्यामुळे भाजीपाला, किराणा खरेदी करायचा असेल तर आसरअल्लीला गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. सिरोंचा हे तालुका मुख्यालय या गावांपासून सुमारे ५५ किमी अंतरावर आहे. त्यामुळे अनेकांनी तर तालुकास्थळ सुध्दा बघितला नाही. अशी या भागातील नागरिकांची विपरित स्थिती आहे. पातागुडम ते सिरोंचा दरम्यान मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरील जवळपास सर्वच नाल्यांवरील पुलांची उंची वाढविण्यात आली आहे. मात्र सोमनपल्ली नाल्यावरील ठेंगणा पूल अजुनही कायम आहे. हा परिसर जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे थोडाही पाऊस पडला तरी नाला ओसंडून वाहण्यास सुरूवात होते. मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सोमनपल्ली नाल्यावरून सतत १५ दिवस पाणी वाहत होते. त्यामुळे या संपूर्ण गावांचा संपर्क तुटला होता. नाल्यावरील पुलावरून पाच फुटापेक्षा अधिक पाणी होते. या पाण्यातूनही काही नागरिक मार्ग काढत होते.
पूर परिस्थितीत या परिसरातील नागरिकांना डोंग्याने प्रवास करावा लागतो. मात्र हा प्रवास अतिशय धोकादायक राहतो.
दीड महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित
सिरोंचा तालुकास्थळापासून सुमारे ५५ किमी अंतरावर असलेला पातागुडमचा परिसर जंगलाने व्यापला आहे. जंगलातून वीज तारा टाकल्या असल्याने पावसाळ्यात वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. ही बाब येथील नागरिकही मान्य करतात. मात्र एकदा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर तो दुरूस्त करण्यासाठी येथील महावितरणचे कर्मचारी कोणतीच कार्यवाही करीत नाही. त्यामुळेच या परिसरातील वीज पुरवठा मागील दीड महिन्यांपासून खंडीत झाला आहे. दुर्गम भागातील आदिवासी नागरिक कोणतीही तक्रार करीत नाही. याचा गैरफायदा या परिसरातील वीज कर्मचारी घेत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
अनेकांनी बघितले नाही तालुकास्थळ
सिरोंचा हे तालुकास्थळ पातागुडमपासून सुमारे ५५ किमी अंतरावर आहे. या परिसरातील गावे जंगलाने व्यापली आहेत. सिरोंचाला जायचे असेल तर सर्वप्रथम आसरअल्ली गाठावे लागते. आसरअल्लीपर्यंत जाण्यासाठी वाहने उपलब्ध नाहीत. त्यामुळे विशेष करून अनेक महिलांनी सिरोंचा हे तालुकास्थळ सुध्दा अजूनपर्यंत बघितले नाही. जिल्हास्थळ तर फार दूर आहे.