विवाह जुळवताना अडचणी; अटी- शर्थीमुळे उपवरांचा जीव मेटाकुटीला !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 04:48 PM2024-05-11T16:48:05+5:302024-05-11T16:49:27+5:30

Gadchiroli : पस्तिशी ओलांडलेल्यांची प्रत्येक गावांमध्ये निर्माण झाली फौज

Difficulties in arranging marriages now a days | विवाह जुळवताना अडचणी; अटी- शर्थीमुळे उपवरांचा जीव मेटाकुटीला !

Difficulties in arranging marriages now a days

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी :
विवाह सोहळा अनेक धर्मात हा एक विधी, संस्कार, करार या स्वरूपात पाहिला जातो. कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी विवाह ही एक कायदेशीर पद्धती आहे. विवाहात फक्त एका स्त्री आणि पुरुषाचा संबंध जोडला जात नाही, तर दोनपेक्षा अधिक कुटुंब जोडले जातात. असे जरी असले, तरी सध्याच्या काळात विवाह जुळवणे आणि तो टिकवणे तारेवरची कसरतच असते. विवाह जुळवताना अनेक अडचणी येतात. सध्या प्रत्येक गावांमध्ये पस्तिशी ओलांडलेल्या उपवरांची फौज दिसून येते.

पूर्वीच्या काळी एखाद्या मुलामुलींचा विवाह घरातील वडीलधारी मंडळी, कर्ते व्यक्ती परस्पर ठरवायचे. अनेकदा मुले-मुली एकमेकांना थेट लग्नातच पाहायचे. संगणक आणि मोबाइलच्या युगात आणि करिअरचा विचार करून उत्पन्नाचा, शिक्षणाचा विचार करून विवाह ठरायला लागले. या सर्व झटापटीत अनेक मुला-मुलींचे वय वाढत चालले आहे. अनेक मुला-मुलींचे रूपांतर प्रौढांत होत असल्याने बेरोजगारांचे व शेतकरी पुत्रांचे विवाह जुळणे ही सामाजिक समस्या बनली आहे.

सूचक केंद्रही झाले हतबल
अनेक विवाह संस्था, वधू-वर सूचक केंद्र, विवाह जमवणारे रात्रंदिवस प्रयत्न करतात; मात्र तरीही ही समस्या सुटताना दिसत नाही. वैद्यकीय दृष्टीने पाहता मुला-मुलींच्या वयाला संततीप्राप्तीसाठी ठराविक मर्यादा आहे. वय जसे वाढत जाईल तसतसी संततीप्राप्तीची प्रक्रिया गुंतागुंतीची होत जाते, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. वधू-वर सूचक केंद्रांनाही विवाह जुळवताना अडचणी येत आहेत.

खोडेच खोडे
• विवाह जमवताना आई- वडिलांव्यतिरिक्त नातलगांमधील अनेकांचा विचार घेतला जातो. ते सुद्धा अनेक चौकशा करून खोडा घालतात.

बेरोजगार, शेतकरी मुलांसमोर आव्हान
लग्न जुळवताना मुलगा नोकरी करतो काय, त्याच्याकडे रोजगार आहे काय? की तो सरकारी नोकरी करतो, याची आवर्जून चौकशी केली जाते. मुलीच्या वडिलांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, याचा ठाव लागत नाही.
• अनेक लग्नसंबंध जमवताना मुली-मुलांबरोबरच दिसण्याची तुलना करतात, अनेकदा पगाराची तुलना करतात, शिक्षणाची तुलना करतात आणि चांगल्या मुलांना नकार देतात. बेरोजगार युवा, तसेच शेतकरी मुलाला लग्न जुळवण्यासाठी कसरत करावी लागते.

युवक व युवतींचे लग्न उशिरा जुळते. यामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतो. भविष्यात मूलबाळ होण्यासाठी अडचणी येऊ शकतात किवा उशीर लागू शकतो. यामुळे योग्य वयात लग्न होणे आवश्यक आहे.
डॉ. शीलू चिमूरकर, आरमोरी

 

Web Title: Difficulties in arranging marriages now a days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.