अर्धवट पूल बांधकामामुळे अडचणी वाढल्या
By admin | Published: August 8, 2015 01:34 AM2015-08-08T01:34:00+5:302015-08-08T01:34:00+5:30
चामोर्शी तालुक्यातील तळोधीचे बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर ...
प्रशासनाचे दुर्लक्ष : कडुली नाल्यावरील पूल धोकादायक
तळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्यातील तळोधीचे बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर कंत्राटदाराने केवळ ५० मीटरच्या अंतरावर सिमेंट पायल्या टाकून कच्चा पूल उभारला आहे. सदर पूल अर्धवट असल्याने या मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी अर्धवट पूलामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तळोधी बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावर पूल नसल्यामुळे या भागातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना प्रचंड अडचण जाणवत होती. या ठिकाणी पुलाची मागणी सातत्याने करण्यात आल्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी पुलाचे बांधकाम मंजूर केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे काम एका खासगी कंत्राटदाराकडे सोपविले. उन्हाळ्यात संबंधित कंत्राटदाराने या ठिकाणी केवळ ५० मीटर अंतरावर सिमेंटच्या सहा पायल्या टाकून पुलाचे अर्धवट काम केले. या ठिकाणी आणखी दीडशे मीटर अंतरापर्यंत पूल होणे आवश्यक आहे. तेव्हाच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ शकते. संबंधित कंत्राटदाराने पुलाच्या अग्रभागी गोटा पिचिंग न केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वैनगंगा नदीघाटावरील स्मशानभूमीत प्रेत दफनविधीसाठी याच मार्गाचा उपयोग होतो. मात्र अर्धवट पुलामुळे व रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात स्मशानभूमीत जाऊन दफनविधी करण्यास अडचण येत आहे. प्रशासनाने या ठिकाणी केवळ ५० मीटरचाच रस्ता कसा काय मंजूर केला, असा प्रश्न या भागातील नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. नाल्याच्या पलीकडे हजारो एकर शेती असून पुलाअभावी शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्याऐवजी उलअ वाढला आहे. (वार्ताहर)
दोन पुलाचे काम प्रलंबितच
तळोधी (मो.) गावाकडून दागोबा देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर एक नाला आहे. तसेच वन विभागाच्या नाक्याजवळून वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावर एक नाला आहे. या दोन्ही नाल्यावर पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून मागणीही सातत्याने होत आहे. मात्र प्रशासनाने या दोन्ही नाल्यावर पुलाचे बांधकाम मंजूर केले नाही. त्यामुळे या मार्गावरील रहदारी प्रभावीत होत आहे. पावसाळ्यात या भागातील शेतकरी जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करतात. प्रशासनाने या दोन्ही नाल्यावर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.