सिंचन विहिरीऐवजी बोअर खोदून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:23 AM2021-06-27T04:23:47+5:302021-06-27T04:23:47+5:30
रांगी : शासनामार्फत बहुतांश शेतकऱ्यांना सिंचन विहिरी खोदून देण्यात आल्या आहेत. मात्र, या विहिरींच्या पाण्याची पातळी खोलात गेली आहे. ...
रांगी : शासनामार्फत बहुतांश शेतकऱ्यांना सिंचन विहिरी खोदून देण्यात आल्या आहेत. मात्र, या विहिरींच्या पाण्याची पातळी खोलात गेली आहे. त्यामुळे पाणी पुरत नाही. या विहिरींना बोअर करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
शहरातील नाल्यांची दुरुस्ती करा
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय, शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते.
पांढरे पट्टे विरहित दिसतात गतिरोधक
आष्टी : वाहनचालकांना रस्त्यावरील गतिरोधक दिसावे, यासाठी गतिरोधकावर पांढरे पट्टे मारले जातात. मात्र बहुतांश गतिरोधकांवर पट्टे दिसत नाही. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अनेक अवजड वाहनधारक वेगाने जातात.
बसथांब्याची दुरवस्था
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे गायब आहेत.
मनोऱ्याची रेंज वाढवा
धानोरा : तालुक्यातील मोहली येथे बीएसएनएलचा मनोरा आहे. परंतु, त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दुधमाळा, गिरोला, गोडलवाही आदी ठिकाणी भ्रमणध्वनीचे मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अहेरीत वाढले अतिक्रमण
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून कारवाई हाेत नाही.
सिरकाेंडाजवळ पूल बांधा
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
पट्ट्यांसाठी अट शिथिल करा
गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. अटीमुळे अनेक दावे प्रलंबित आहेत.
वसतिगृह निर्माण करा
आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करण्याची गरज आहे.
मोकाट डुकरांचा हैदोस
गडचिरोली : गोकुलनगर लगतच्या आशीर्वादनगरात मोकाट डुकरांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास डुकराच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याशिवाय दुर्गंधी पसरल्यामुळे आरोग्य धोक्यात आहे.
तलावात अतिक्रमण
धानोरा : तालुक्यातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमणामुळे तलाव नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जड वाहतूक जाेेमात
आलापल्ली : छत्तीसगड, आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात जड वाहनांनी वाहतूक केल्या जाते. त्यामुळे शहरातील व जिल्ह्यातील रस्ते खराब झाले आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. जड वाहतुकीमुळे अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कारवाईची गरज आहे.
कोरचीत मूलभूत समस्या
कोरची : तालुक्यात सिंचन, रस्ते, वीज, पाणी आदींसह अनेक समस्या ऐरणीवर आहेत. त्यामुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे. या तालुक्यात आरोग्याची समस्या गंभीर आहे. शिवाय तालुक्यातील विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. शाळांच्याही समस्या कायम आहेत. या समस्या साेडविण्याची मागणी हाेत आहे.
माेकळ्या जागेवर कचरा
गडचिरोली : नगरपालिका क्षेत्रात अनेक वॉर्डांमध्ये ओपन स्पेस आहेत. मात्र काही मोजक्याच ओपन स्पेसला संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या ओपन स्पेसला संरक्षण भिंत नाही. त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी हाेत आहे.