आश्रमशाळांमध्ये पुन्हा डिजिटल हजेरी
By Admin | Published: June 23, 2017 12:47 AM2017-06-23T00:47:12+5:302017-06-23T00:47:12+5:30
गडचिरोली : जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या हजेरीची नोंद ठेवण्यासाठी
जुन्या बंद : नवीन बायोमेट्रिक मशिन्समुळे शिक्षकांच्या दांडीला बसणार लगाम
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली : जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या हजेरीची नोंद ठेवण्यासाठी बायोमेट्रिक मशिन लावल्या होत्या. परंतू त्यांची वॉरंटी संपताच त्या बंद पडल्या. त्यामुळे स्थानिक स्तरावर चांगल्या मशिन्स खरेदी करून पुन्हा डिजीटल हजेरी सुरू केली जाणार आहे.
जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेल्या आश्रमशाळांमध्ये शिक्षक नियमित हजर राहात नसल्याच्या तक्रारी पालकांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून मुंबईपर्यंत करण्यात आल्या होत्या. त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने सर्व शासकीय आश्रमशाळांध्ये शिक्षकांच्या येण्या-जाण्याच्या नोंदी ठेवण्यासाठी बायोमेट्रिक मशिन लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नाशिक आयुक्त कार्यालयातूनच सर्व मशिन खरेदी करून त्या जिल्ह्याजिल्ह्यात पाठविल्या होत्या.
गडचिरोलीसाठी आलेल्या मशिनची खरेदी २०१२ मध्येच झालेली असताना त्या मशिन गडचिरोलीत पोहोचून संबंधित आश्रमशाळांमध्ये बसविण्यासाठी १ ते २ वर्षे लागली. २०१४ मध्ये सर्व शासकीय आश्रमशाळांध्ये थम मशिन लागल्या होत्या. मात्र अवघ्या दोन वर्षात म्हणजे डिसेंबर २०१६ मध्ये एक-एक करीत सर्व मशिन बंद पडल्या. त्यानंतर शिक्षकांची हजेरी जुन्याच पद्धतीने घेणे सुरू झाले.
नाशिक येथून आलेल्या त्या बायोमेट्रिक मशिनची वॉरंटी ३ वर्षाचीच होती. ती २०१५ मध्ये संपली. त्यामुळे वॉरंटीचा काळ संपल्यानंतर संबंधित कंपनीने त्या मशिन विनाशुल्क दुरूस्त करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत आता चांगल्या दर्जाच्या मशिन खरेदी करून त्या सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये लावण्याचा विचार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून केला जात आहे.