४००० ग्राहकांना डिजीटल वीज मीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:44 PM2019-02-26T23:44:51+5:302019-02-26T23:45:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महावितरणने जुने व नादुरूस्त मीटर बदलवून देण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महावितरणने जुने व नादुरूस्त मीटर बदलवून देण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील १० महिन्यांच्या कालावधीत सुमारे ३ हजार ५७६ ग्राहकांना नवीन डिजीटल वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अजून काही ग्राहकांना नवीन मीटर देण्याचे काम सुरू आहे.
वीज ही प्रत्येक कुटुंबाची अत्यावश्यक गरज झाली आहे. मात्र वाढत्या वीज बिलामुळे नागरिक तेवढेच त्रस्त सुद्धा आहेत. वीज बिलाची रक्कम ठरविण्याचे महत्त्वाचे यंत्र म्हणजे वीज मीटर आहे. वीज मीटरमध्ये बिघाड असल्यास कधीकधी आवश्यकतेपेक्षा अधिकचे वीज बिल येते. अशावेळी ग्राहकांकडून ओरड सुरू होते. तसेच महावितरणवरील नागरिकांचा विश्वासही उडायला लागतो. त्यामुळे ग्राहकांकडून जेवढा वीज वापर तेवढेच वीज बिल त्याला यावा, यादृष्टीने महावितरण प्रयत्न करीत आहे.
जुने तंत्रज्ञान असलेले मीटर बदलून त्याऐवजी डिजिटल मीटर लावले जात आहेत. मागील वर्षभरापासून महावितरणने मीटर बदलवून देण्याची मोहीम सुरू केली आहे. वीज मीटर नादुरूस्त असल्याची तक्रार संबंधित ग्राहकाकडून प्राप्त झाल्यानंतर नवीन डिजिटल मीटर बसवून दिले जात आहे. जुन्या चक्रीयुक्त मीटरमध्ये सहज छेडछाड करता येत होती. त्यामुळे विजेची चोरी मोठ्या प्रमाणात होत होती. ही बाब महावितरणच्या लक्षात आल्यानंतर आता महावितरण स्वत: पुढाकार घेऊन चक्रीयुक्त मीटर बदलून त्या ठिकाणी नवीन डिजिटल मीटर लावले जात आहेत.
अचूक रिडिंगवर महावितरणचा भर
उन्हाळा सुरू झाल्यानंतर विजेचा वापर वाढणार आहे. वीज वापर वाढल्याने जास्तीचे वीज बिल येणे साहजिक आहे. मात्र एखाद्या ग्राहकाच्या वीज मीटरमध्ये बिघाड असल्यास त्याला चुकीने मोठ्या रकमेचे बिल येते. अशावेळी संबंधित ग्राहक आश्चर्यचकीत होतो व ही बाब सभोवतालच्या १० व्यक्तींना सांगतो. त्यामुळे महावितरणची प्रतिमा मलीन होते. प्रत्येक ग्राहकाला त्याच्या वीज वापरानुसार वीज बिल उपलब्ध व्हावे, यासाठी वीज मीटर बदलविले जात असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रत्येक मीटरचे काटेकोर रिडिंग होईल, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.