डिजिटलायझेशनने हिरावली कुंचल्यातील कला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:37 AM2021-05-18T04:37:35+5:302021-05-18T04:37:35+5:30
दहा ते पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत पेंटिंगचा व्यवसाय कसाबसा सुरू होता. काही ठिकाणी अजूनही पेंटिगची दुकाने सुरू आहेत. परंतु काळानुरूप बराच ...
दहा ते पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत पेंटिंगचा व्यवसाय कसाबसा सुरू होता. काही ठिकाणी अजूनही पेंटिगची दुकाने सुरू आहेत. परंतु काळानुरूप बराच बदल घडला. डिजिटल व सोशल नेटवर्किंग साईटमुळे पारंपरिक साधने कालबाह्य होऊ लागली आहेत. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या काळात पेंटिंग व्यावसायिकांना बरीच मागणी असायची यातून त्यांना बऱ्याच प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळायचे. परंतु आता याला बगल देत मोठमोठ्या प्रिंटिंग प्रेसमधून डिजिटल बॅनर पोस्टर्स छापली जात असल्याने पारंपरिक पेंटरचा व्यवसाय या डिजिटलायझेशनच्या युगाने हिरावला. याचाच परिणाम असा की युवा वर्ग पेंटिंग व्यवसाय शिकण्याकडे धजत नाही. केवळ इमारती रंगविण्याचे काम सध्या कुशल पेंटरमार्फत सुरू आहे; परंतु पूर्वीसारखा असलेला अनोखा व कौशल्यपूर्ण व्यवसाय आता जुन्या पेंटरच्याही हाती राहिला नाही. वाहने व बॅनर रंगविण्याचे काम डिजिटल साधनांद्वारे होत असल्याने कुंचल्यातील पूर्वीची कला नामशेष होते की काय असे चित्र दिसून येत आहे.