जिल्ह्यातील गरोदर व बाळंत महिलांना १० कोटी ९५ लाखांची थेट मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:35 AM2021-03-19T04:35:58+5:302021-03-19T04:35:58+5:30

गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करण्याची वेळ येऊ नये आणि आली तरी आरोग्य, आहार याची हेळसांड होऊ नये म्हणून हा ...

Direct assistance of Rs. 10 crore 95 lakhs to pregnant and lactating women in the district | जिल्ह्यातील गरोदर व बाळंत महिलांना १० कोटी ९५ लाखांची थेट मदत

जिल्ह्यातील गरोदर व बाळंत महिलांना १० कोटी ९५ लाखांची थेट मदत

Next

गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करण्याची वेळ येऊ नये आणि आली तरी आरोग्य, आहार याची हेळसांड होऊ नये म्हणून हा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा उद्देश आहे. आर्थिक अडचणीमुळे प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता चांगली नसतानासुद्धा अनेक माता कामावर जातात. त्यामुळे बाळाचे योग्य पोषण न झाल्याने ते कुपोषित होते. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गरोदर व स्तनदा मातेस सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला आलेल्या नवजात बालकांचेही आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी मातृवंदना योजनेतून महिलेच्या बँक खात्यात तीन टप्प्यांत ५ हजार रुपये टाकले जातात. याशिवाय जननी सुरक्षा योजनेतून ५ हजार ७०० रुपये अतिरिक्त लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटच्या मासिक पाळीच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे जमा करणे आवश्यक असते. जिल्ह्याच्या दुर्गम भागात अनेक महिलांना याची माहितीच नसते; पण त्या भागातील आशा आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या योजनेचे लाभार्थी वाढले आहेत.

जिल्ह्यातील माता व बाल मृत्यूदर कमी करण्यास ही योजना कारणीभूत ठरली असल्याचे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. समीर बनसोडे यांनी सांगितले. जिल्ह्यातील पहिले बाळंतपण असणाऱ्या अधिकाधिक मातांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक अश्विनी मेंढे यांच्याशी संपर्क करून नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

क्यूआर कोड स्कॅनरचे वाटप

जिल्ह्यातील प्रथम गरोदर व स्तनदा मातांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ४ मार्च २०२१ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्या हस्ते सर्व १२ तालुक्यांमध्ये क्यूआर कोड स्कॅनर मशीनचे वाटप करण्यात आले. या मशीनच्या आधारे लाभार्थीचे आधार कार्ड स्कॅन केले जाते. त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यास आणखी सोईचे होईल, असे डॉ. शंभरकर यांनी सांगितले.

(बॉक्स)

२६,२८६ महिलांची नोंदणी

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याकरिता राज्यस्तरावरून २५ हजार ९६० महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात २६ हजार २८६ महिला गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात हे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. सर्व लाभार्थ्यांच्या बँक अथवा पोस्ट खात्यामध्ये १० कोटी ९५ लाखांची रक्कम जमा करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Web Title: Direct assistance of Rs. 10 crore 95 lakhs to pregnant and lactating women in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.