अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक संचालक अविरोध
By admin | Published: November 4, 2016 12:11 AM2016-11-04T00:11:38+5:302016-11-04T00:11:38+5:30
अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सध्या या बाजार समितीवर हमाल/मापाडी मतदार संघातून सेननवाज मेहबूब शेख हे अविरोध निवडून आले आहे.
चार आघाड्या मैदानात : विभाजनानंतर पहिलीच निवडणूक
अहेरी : अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सध्या या बाजार समितीवर हमाल/मापाडी मतदार संघातून सेननवाज मेहबूब शेख हे अविरोध निवडून आले आहे.
अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्यात आली. त्यानंतर ही होणारी पहिलीच निवडणूक आहे. १८ जागांसाठी ८८ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सहकारी संस्था मतदार संघातून सर्वसाधारण ७ जागांसाठी २८, महिला मतदार संघातून २ जागांसाठी ७, इतर मागासवर्गीयांच्या १ जागेसाठी ३ तर विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या १ जागेसाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. सहकारी संस्था मतदार संघात ११ जागांकरिता ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण २ जागांसाठी ६, अनुसूचित जाती/जमातीच्या १ जागेसाठी ७ व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या १ जागेसाठी ४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. व्यापारी, अडते व प्रक्रियाकार मतदार संघात २ जागांसाठी ७ उमेदवारांचे अर्ज आहेत. ४ नोव्हेंबर रोजी या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २४ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
या बाजार समितीसाठी सध्या ४ पॅनल रिंगणात उतरले आहे. विद्यमान पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वातील भाजप व नाविसंचे एक पॅनल तर माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वातील राकाँ समर्थकांची शेतकरी विकास आघाडी व जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात एक पॅनल मैदानात आहे. याशिवाय गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अजय नागुलवार यांच्या नेतृत्वातही उमेदवार पॅनल करून उभे आहेत. त्यामुळे चौरंगी सामना या बाजार समितीच्या निवडणुकीत होणार आहे. आजवर या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँगे्रस आघाडीचे वर्चस्व होते. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)