डांबरी रस्ते झाले मातीमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:18 PM2018-11-18T22:18:26+5:302018-11-18T22:18:54+5:30
मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरूस्ती झाली नसल्याने सिरोंचा तालुक्यातील मुख्य मार्गासह ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मार्गांची बकाल अवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेल्याने रस्ते खडीकरणाप्रमाणे झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरूस्ती झाली नसल्याने सिरोंचा तालुक्यातील मुख्य मार्गासह ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मार्गांची बकाल अवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेल्याने रस्ते खडीकरणाप्रमाणे झाले आहेत. मार्गांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत असताना शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
सिरोंचा तालुक्यातील बहुतांश भाग हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहूल आहे. या तालुक्यातील सागवान प्रसिध्द आहे. जंगलाच्या माध्यमातून शासनाला शेकडो कोटी रूपयांचा महसूल उपलब्ध होते. मात्र या तालुक्याच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गावांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. सिरोंचा हे तालुका स्थळ आहे. मात्र याही शहराचा विकास रखडला आहे. सिरोंचा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. त्यामुळे शहराचा विकास झपाट्याने होईल, अशी अपेक्षा येथील नागरिक बाळगत होता. मात्र यापेक्षा फोल ठरली आहे.
सिरोंचा शहराचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. मुख्य मार्गावरच्या खड्ड्यांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खड्ड्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, खड्डा चुकविणे अशक्य झाले नाही. पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते. बाजुला एखादे वाहन गेल्यानंतर त्या वाहनाचे पाणी बाजुच्या व्यक्तीवर उडत असल्याने वाहन चालविणेही कठीण होत होते.
मुख्य मार्गांचीही दशा कायम
सिरोंचा तालुक्यातून ६३ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो. मात्र या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात तेलंगणा राज्यातील ट्रक चालत असल्याने या मार्गाची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशीच अवस्था सिरोंचा-आलापल्ली या १०० किमी मार्गाची आहे. जिल्ह्यातील हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. मात्र याही मार्गाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. शेकडो वाहनधारकांना जीव मुठीत घालून प्रवास करावे लागते.