अपंग प्रमाणपत्रासाठी दिव्यांगांची ससोहोलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:49 AM2021-02-25T04:49:11+5:302021-02-25T04:49:11+5:30
गडचिराेली : विविध शासकीय याेजनांच्या लाभासाठी तसेच बस, रेल्वे प्रवास व इतर सवलतींचा लाभ घेण्यासाठी अपंग व्यक्ती व विद्यार्थ्यांना ...
गडचिराेली : विविध शासकीय याेजनांच्या लाभासाठी तसेच बस, रेल्वे प्रवास व इतर सवलतींचा लाभ घेण्यासाठी अपंग व्यक्ती व विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते. त्याअनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात दर गुरूवारी व शुक्रवारला तपासणी, नाेंदणी व प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही केली जाते. नाेंदणीसाठी तसेच प्रमाणपत्र घेण्यासाठी गुरूवारी दिव्यांगांची गर्दी उसळते. कोरोनाकाळातही जिल्हाभरातील दिव्यांगांना त्यासाठी धडपड करावी लागत आहे.
काेराेना संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून गडचिराेली जिल्ह्यात रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. दरम्यान प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या असून मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. असे असले तरी फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती व अपंगांना काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स...
अपंग प्रमाणपत्र कशासाठी?
- दिव्यांग विद्यार्थी व नागरिकाला बस पास सवलत तसेच रेल्वे पास सवलत घेण्यासाठी अपंग प्रमाणपत्र गरजेचे असते. याशिवाय संजय गांधी निराधार याेजना तसेच आरक्षणातून नाेकरी मिळविण्यासाठी अपंग प्रमाणपत्र गरजेचे असते.
- घरकूल याेजना, शैक्षणिक क्षेत्रातील वेळात सूट, साहित्याची पूर्तता, परीक्षेच्या कालावधीत पेपर साेडविण्यासाठी लेखक मिळताे. मनाेधैर्य याेजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असते.
- दिव्यांगांच्या कल्याणार्थ ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषदेतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी ५ टक्के निधी आरक्षित ठेवावा लागताे. या निधीतून दिव्यांगांना साहित्य दिले जाते. शिवाय दिव्यांग, अपंग व्यक्तींना विवाह प्राेत्साहन अनुदान याेजनेचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्राची आवश्यकता पडते.
बाॅक्स...
आठवड्यातून १०० वर दिव्यांगांची हाेते नाेंद
जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र देण्यासाठीची कार्यवाही करण्याकरिता वैद्यकीय तपासणी केली जाते. यासाठी गुरूवार व शुक्रवार असे दाेन दिवस ठरवून देण्यात आले आहेत. या दाेन दिवशी आठवड्यातून १०० पेक्षा अधिक दिव्यांगांची नाेंद असते. या दिव्यांगांना पुढील आठवड्यात येणाऱ्या गुरूवार व शुक्रवारला प्रमाणपत्र दिले जाते.
बाॅक्स...
तालुकास्थळी हाेत नाेंदणी व तपासणी
गडचिराेली जिल्हा मुख्यालयातील शासकीय रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र नाेंदणी व वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हाभरातून दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थी येत असतात. दरम्यान येथे गर्दी हाेऊ नये यासाठी आता तीन तालुकास्थळी मंगळवारला नाेंदणी व तपासणीची सुविधा ठेवण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याच्या चवथ्या मंगळवारला कुरखेडा येथे, पहिल्या मंगळवारला आरमाेरी व तिसऱ्या मंगळवारला अहेरी येथील रुग्णालयामध्ये नाेंदणी व दिव्यांगांची तपासणी केली जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयातून तीन तज्ज्ञ डाॅक्टरांसह १० जणांची चमू जाऊन हे काम करीत असते. पण त्यांच्या भेटीच्या दिवसात आणि ठिकाणांमध्येही वाढ करणे गरजेचे आहे.
बाॅक्स....
एका दिव्यांगाला लागताे एक तास
अपंग प्रमाणपत्रासाठीची कार्यवाही करण्याकरिता सर्वप्रथम ऑनलाईन नाेंदणी करावी लागते. शासनाच्या वेबसाईटवर नाेंदणी करण्यासाठी एका दिव्यांगाला २०ते २५ मिनीट कालावधी लागताे. येथे परिपूर्ण माहिती अपलाेड करावी लागते. हे काम झाल्यावर संबंधित दिव्यांगांची शारीरिक व वैद्यकीय तपासणी केली जाते. यासाठी एका दिव्यांगाला अर्धा तास तर काही दिव्यांगांना ४० मिनिटेही लागतात. एकूणच एका दिव्यांग व्यक्तीला हे काम करून घेण्यासाठी एक तास द्यावा लागताे.
काेट...
जिल्हा सामन्य रुग्णालयात दिव्यांगांची गर्दी हाेत असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागताे. ही गर्दी कमी करण्यासाठी व काम गतीने पूर्ण हाेण्यासाठी येथे मनुष्यबळ वाढविण्यात यावे. उर्वरित नऊ तालुक्यात महिन्यातून एकदा नाेंदणी व वैद्यकीय तपासणीची सुविधा ठेवावी, अशी मागणी आहे.
- सुरज गेडाम, दिव्यांग लाभार्थी