साहित्यासाठी दिव्यांगांचे मोजमाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:45 AM2019-09-17T00:45:24+5:302019-09-17T00:45:58+5:30
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम २००९ अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करायचे आहे. गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण देताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी मतिमंद, बहुविकलांग, सेरेब्रल प्लॉॅसी, अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना स्नायू व सांध्याअंतर्गत तीव्र दोष असलेल्या विद्यार्थ्यांना साहित्य वितरित केले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : समग्र शिक्षा अभियानांतर्गत १६ सप्टेंबर रोजी गटसाधन केंद्र देसाईगंज येथे दिव्यांगांना साहित्य देण्यासाठी त्यांच्या अवयवांचे मोजमाप करण्यात आले. या शिबिराला आरमोेरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची या चार तालुक्यांमधील ९८ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम २००९ अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करायचे आहे. गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण देताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी मतिमंद, बहुविकलांग, सेरेब्रल प्लॉॅसी, अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना स्नायू व सांध्याअंतर्गत तीव्र दोष असलेल्या विद्यार्थ्यांना साहित्य वितरित केले जाते. मोजमापानुसार साहित्य करून दिल्यास त्यांच्या शरीराची स्थिती टिकण्यास मदत होते. तसेच अध्ययन प्रक्रिया सुलभ होऊन अध्ययन प्रक्रियेतील अडथळे दूर होण्यास मदत होईल.
देसाईगंज येथील शिबिराला कुरखेडा, कोरची, आरमोरी, देसाईगंज या चार तालुक्यांमधील १३९ दिव्यांग विद्यार्थी निश्चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात ९८ विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार अवयवाचे मोजमाप करण्यात आले. लवकरच त्यांना साहित्याचे वितरण केले जाणार आहे. शिबिरासाठी ललीत कुमार, शुभम कुमार, ललीत चौधरी, सुशील सिंह, संजय नांदेकर, भाऊराव हुकरे, अविनाश पिंपळशेंडे, अल्का सोनेकर, रनजीत चौधरी, केदार बन्सोड यांच्यासह चारही तालुक्यातील विशेषतज्ज्ञ व साधनव्यक्ती हजर होते.
१७ ला आलापल्ली तर १८ ला गडचिरोली येथे शिबिर
१७ सप्टेंबर रोजी मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यांचे आलापल्ली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मुलांची शाळा व १८ सप्टेंबर रोजी गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांचे शिबिर जिल्हा परिषद हायस्कूल, गडचिरोली येथे होणार आहे.
तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडील पालकाच्या उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड किंवा मदतदान ओळखपत्र यापैैकी एक दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार दिव्यांगत्व दिसेल असे दोन पासपोर्ट साईज फोटोे, ज्या विद्यार्थ्याकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र नाही, अशा विद्यार्थ्याची माहिती परिशिष्ठ द मध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीनिशी परिपूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे.