‘त्या’ बहिष्कृत कुटुंबांना अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने गावप्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:38 AM2017-07-18T00:38:48+5:302017-07-18T00:38:48+5:30
ग्रामीण भागात सामाजिक सलोख्याचे वातावरण दिसत असले तरी एटापल्ली तालुक्यातील मेडरी गावाजवळच्या उईकानटोल्यात...
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : ग्रामीण भागात सामाजिक सलोख्याचे वातावरण दिसत असले तरी एटापल्ली तालुक्यातील मेडरी गावाजवळच्या उईकानटोल्यात पाच कुटुंबांवर गावकऱ्यांनी सामाजिक बहिष्कार टाकून त्यांना गावाबाहेर काढले होते. आठवडाभर भटकंती केल्यानंतर या कुटुंबाने पोलिसांकडे दाद मागितली. अखेर कसनसूर पोलिसांच्या मध्यस्थीने या कुटुंबांना गावात पुन्हा प्रवेश देण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, एटापल्लीपासून ८० किलोमीटर अंतरावर मेडरी हे गाव आहे. या गावात केमुकुंद तिरंगा, गोविंद पांडू कोकडे, गुरूदास तिरंगा आणि मारवाडी तिरंगा यांचे कुटुंबीय राहतात. हे लोक पूजा-अर्चना करीत असल्यामुळे त्यांची प्रगती होत आहे, या कारणावरून गावातील इतर लोक त्यांना त्रास देत होते. मार्च महिन्यात या चार परिवारांना गावातील नागरिकांनी विहिरीवरून आणि नळावरून पाणी भरण्यास मज्जाव केला. त्यामुळे इकडून-तिकडून पाणी आणून हे कुटूंब कसेतरे दिवस काढत होते.
दरम्यान १० जुलै रोजी गावकऱ्यांनी मिळून पीडित कुटूंबांच्या घरांना कुलूप ठोकून त्यांना गावातून हाकलून लावले. त्यामुळे हे कुटूंब आठवडाभर छत्तीसगडमधील कुरेनार गावात आश्रयाला गेले. या प्रकाराची माहिती मेडरीच्या पोलीस पाटलांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या पीडित कुटूंबांशी संपर्क करून १६ जुलै रोजी कसनपूर उप पोलीस ठाण्यात बोलविले.
सोबतच गावकऱ्यांना घेऊन ते ठाण्यात पोहोचले. ठाण्याचे प्रभारी अधिकारी व्ही.व्ही. वाडकर यांच्या मार्गदर्शनात पी.के. मगर व एस.डी. पाटील यांनी मिळून लोकांना समजावले. त्यांच्या मनात त्या कुटुंबीयांबद्दल असलेले गैरसमज दूर केले. जवळपास दोन तासांच्या या बैठकीनंतर पीडित कुटुंबीयांना मेडरी गावात पाठविण्यात आले.