कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने वैरागडवासीय त्रस्त
By admin | Published: April 22, 2017 01:22 AM2017-04-22T01:22:19+5:302017-04-22T01:22:19+5:30
मागील १५ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने वैरागड परिसरातील नागरिकांना ऐन उकाड्याच्या
विद्युत जनित्राचा अभाव : महावितरणच्या चुकीच्या नियोजनाचा फटका
वैरागड : मागील १५ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने वैरागड परिसरातील नागरिकांना ऐन उकाड्याच्या दिवसात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात विद्युत पुरवठा करण्यासाठी जे विद्युत जनित्र आहेत. त्यांची संख्या कमी आहे. तसेच महावितरणच्या चुकीच्या नियोजनामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.
उन्हाळी धान पिकांसाठी आता रात्रंदिवस मोटार विद्युतपंप सुरू राहत असून कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वैरागड येथील गावाच्या सुरूवातीला रांगी-धानोराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला, प्रशासकीय इमारतीच्या बाजुला एक आणि त्याच्याच बाजुला म्हणजे, पोल्ट्री फार्मजवळ व थोड्याच अंतरावर असे एकूण तीन विद्युत जनित्र उभारण्यात आले आहे. वास्तविक या ठिकाणी तीन विद्युत जनित्राची आवश्यकता नाही. चुकीचे नियोजन व नवीन विद्युत जनित्रास मान्यता नसल्याने विजेची समया निर्माण झाली आहे. येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांच्या समस्येची रात्रंदिवस दखल घेत असले तरी वैरागड परिसरात आवश्यक असणाऱ्या क्षमतेपेक्षा कमी वीज पुरवठा होत असल्याने काही दिवस तरी कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे तत्काळ यावर तोडगा काढावा, अशी मागणी वैरागडवासीयांनी केली आहे.
अघोषित भारनियमनाविरोधात देसाईगंजच्या वीज कार्यालयावर नागरिक धडकले
देसाईगंज : गेल्या काही दिवसांपासून देसाईगंज शहरात दररोज दोन तास वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. तर तालुक्याच्या ग्रामीण भागात तीन तास वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. ऐन उकाड्याच्या दिवसात अघोषीत भारनियमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी देसाईगंजच्या वीज कार्यालयावर गुरूवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मोर्चा काढला. राज्य शासनाने कुठलेही वीज भारनियमन जाहीर केले नसतानाही मागील एक महिन्यांपासून दररोज दोन ते तीन तास वीज पुरवठ्याअभावी नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. याशिवाय कमी दाबाची वीज समस्या शहरातील काही वार्डात आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात देसाईगंजच्या १०० नागरिकांनी कार्यालयावर धडक देऊन महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला आहे.