आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा
By admin | Published: May 2, 2017 01:12 AM2017-05-02T01:12:53+5:302017-05-02T01:12:53+5:30
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ...
संघटनेतर्फे सत्कार : जि. प. अध्यक्षांना निवेदन
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर व उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासोबत चर्चा केली व या समस्या सोडविण्याची मागणी केली.
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया दरवर्षी राबवावी, दरवर्षी पाठविलेले गोपनीय अहवाल गहाळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सदर अहवाल कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने अहवाल जतन करून ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना द्यावे, जास्त लोकसंख्या असलेल्या उपकेंद्रात अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात यावे, प्रत्येक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, एनआरएचएम कार्यक्रमामुळे वाढलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मिळण्याबाबत वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करावा, निलंबित कर्मचाऱ्यांना पूर्ववत सेवेत रूजू करून घ्यावे, एनआरएचएम अंतर्गत कर्मचाऱ्यांची ग्रेडेशन पद्धत बंद करावी, एनआरएचएम कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात यावे, सिकलसेल कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे, फेब्रुवारी २०१६ मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना नियमित ११ महिन्यांचे आदेश देण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांना देण्यात आले. या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठस्तरावर आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांनी दिले.
याप्रसंगी आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दीपक चौधरी, कमलेश झाडे, एम. एम. बोडुवार, आशा कोकोडे, लता तिहीतकर, शर्मिला जनबंधू, अमिता नागदेवते, भावना लाजूरकर, हिराजी मेश्राम, बाळू मेश्राम, नेताजी मेश्राम, राजेश जाधव, सिकलसेल संघटनेचे सुरेश ठाकरे, उमाकांत हर्षे, माधुरी भोयर, प्रशांत खोब्रागडे, गुड्डू कुनघाडकर, बावनथडे, फापनवाडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)