वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 11:52 PM2018-10-20T23:52:08+5:302018-10-20T23:54:39+5:30
आलापल्ली येथे उपविभागीय वनाधिकारी म्हणून एन.एस.देवगडे हे रूजू झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : आलापल्ली येथे उपविभागीय वनाधिकारी म्हणून एन.एस.देवगडे हे रूजू झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक वनसंरक्षक एच.जी.मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्राधिकारी के.डी.पाटील, पी.एस.आत्राम, कार्यालय अधीक्षक एच.बी.राठोड, मुख्य लेखापाल पी.एस.बर्लावार यांच्यासह विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, वनकर्मचारी पतसंस्था, महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना, वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटना, वन सामाजिक वनीकरण, कार्यालयीन कर्मचारी संघटना, कास्ट्राईब वनकर्मचारी संघटना, मध्यवर्ती राज्य कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
देवगडे हे महाराष्ट्र वनसेवा २०१४ च्या बॅचचे अधिकारी आहेत. यापूर्वी ते वनप्रबोधिनी चंद्रपूर येथे संचालक म्हणून कार्यरत होते. नावीण्यपूर्ण अध्यापनाच्या पद्धतीबाबत ते वनाधिकाºयांमध्ये लोकप्रिय आहेत. देवगडे हे तरूण रक्ताचे अधिकारी असल्यामुळे वनतस्करी, शिकार व वाळू माफियांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. त्यांच्या अनुभवाचा फायदा वनकर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे मार्गदर्शन सहायक वनसंरक्षक एच.जी.मडावी यांनी केले.
आलापल्ली वनविभागातील वनकर्मचाऱ्यांच्या समस्यांवर सुद्धा चर्चा करण्यात आली. या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर आपल्यास्तरावरील समस्या तत्काळ मार्गी लावू, असे आश्वासन उपविभागीय वनाधिकारी एन.एस.देवगडे यांनी केले.
संचालन वनकर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष उमाजी गोवर्धन तर आभार महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे सचिव रमेश रामटेके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आलापल्ली वनविभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.