मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या कडक प्रशासनाची सर्वत्र चर्चा
By admin | Published: May 22, 2014 11:53 PM2014-05-22T23:53:45+5:302014-05-22T23:53:45+5:30
नियमबाह्य बदल्या व पात्र नसलेल्या लोकांना महत्वाच्या जागांवर बसविणे तसेच प्रतिनियुक्त्या करण्याबाबत जिल्हा परिषद सदस्य नेहमीच मुख्य कार्यकारी अधिकार्यांवर दबाव टाकून
गडचिरोली : नियमबाह्य बदल्या व पात्र नसलेल्या लोकांना महत्वाच्या जागांवर बसविणे तसेच प्रतिनियुक्त्या करण्याबाबत जिल्हा परिषद सदस्य नेहमीच मुख्य कार्यकारी अधिकार्यांवर दबाव टाकून आपले काम करवून घेत होते. परंतु गडचिरोली जिल्हा परिषदेत कार्यरत नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी अंत्यत कठोर पध्दतीने प्रशासन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतेही नियमबाह्य काम करण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिल्या असल्यामुळे सध्या जि.प.चे सत्ताधारी पदाधिकारी चांगलेच अडचणीत आले आहे. बदल्यांचा मोसम असून लाभार्थी पैशाचे बंडल हाती घेऊन उभा समोर दिसत असतानाही पदाधिकारी नियमबाह्य काम मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून करवून घेऊ शकत नाही, अशी जिल्हा परिषदेत चर्चा आहे. त्यामुळे काहींनी सभेमध्ये ठराव पारित करण्यासाठी आता वसुली सुरू केली आहे. काही ठराविक अधिकार्यांच्या हिताचे ठराव मिटींगमध्ये मंजूर करून घेऊन अधिकार्यांवर आपला वचक बसविण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची चर्चा आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या कार्यप्रणालीचे विविध कर्मचारी संघटना व जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कौतुक केले आहे. बर्याच वर्षानंतर चांगल्या अधिकारी मिळाल्यात अशी लोकांमध्ये चर्चा आहे. यापूर्वी कार्यरत मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी बदल्यांचे दुकानच उघडले होते. पदाधिकारी सांगतील त्याच्या बदल्या ठराविक रक्कम घेऊन केल्या जात होत्या. अनेक ब वर्ग वैद्यकीय अधिकार्यांना अ वर्गाचे पदभारही देण्याचे काम या जिल्हा परिषदेत झाले. एकाच वर्षात एकाच कर्मचार्याची दोनवेळा बदलीही करण्याचे पूण्यकर्मही गतकाळात पार पाडल्या गेले. त्यामुळे अशा सवयीतून प्रशासकीय काम करणारे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सीईओंंच्या कायदेशीर कामकाजामुळे कमालीचे हतबल झाले आहेत. ‘अच्छे दिन कब आयेंगे’ याची त्यांना प्रतीक्षा आहे.