रोग व किडीमुळे धानपीक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:38 AM2018-09-16T00:38:34+5:302018-09-16T00:39:14+5:30
मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धान पिकावर कडाकरपा, तुडतुडा, बेरड, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धान पिकावर कडाकरपा, तुडतुडा, बेरड, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पाण्याचाही दुष्काळ निर्माण झाला आहे. परिणामी धानपीक संकटात आले आहे.
यावर्षी अगदी सुरूवातीपासून शेतकऱ्यांना पावसाने साथ दिली. अगदी वेळेवर पाऊस पडल्याने पऱ्हे टाकणे, धानाची रोवणी नियोजित वेळेवर झाली. रोवणीनंतरही पाऊस पडत होता. त्यामुळे धान पीक हिरवेगार धानपीक डोलत होते. मात्र मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. दिवसा कडक ऊन पडत आहे. परिणामी दमट वातावरण निर्माण झाले आहे. दमट वातावरण किडीच्या वाढीसाठी पोषक राहते. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेताला कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येत आहे.
१५ दिवसानंतर धान गर्भावस्थेत राहणार आहे. अशा स्थितीत रोग व किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास धानाच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी धान निसवेपर्यंत डोलत होते. धान निसवताना तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला. या रोगामुळे शेतकऱ्यांचे पीक करपले. काही शेतकऱ्यांनी तर धानाची कापणी सुध्दा केली नाही. मागील वर्षीची स्थिती शेतकऱ्यांना माहित असल्याने शेतकरी चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे. थोडाही रोग आढळून आला तरी फवारणी केली जात आहे. मात्र कधीकधी फवारणी करून सुध्दा रोग आटोक्यात येत नाही व पिकाचे नुकसान होतेवेळी बघितल्याशिवाय शेतकऱ्यासमोर कोणताही पर्याय राहत नाही. सततच्या पावसामुळे सोयाबिन, तूर, कापूस या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी धान पिकाकडून अपेक्षा बाळगूण आहे. मात्र कीड व रोगांमुळे धानाच्या उत्पादनातही घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील अर्धी अधिक जमीन पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने धानाच्या बांधीतील पाणी आटून भेगा पडण्यास सुरूवात झाली आहे. आणखी १५ दिवस पावसाने उसंत घेतल्यास धानपीक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी विविध साधनांच्या माध्यमातून धानपीक वाचविण्याची शर्यत करीत आहेत. काही शेतकºयांकडे सिंचन विहिरी आहेत. मात्र या विहिरीचे पाणी पुरत नसल्याने दर दिवशी एक ते दोन बांध्यांना पाणी करून पीक वाचविण्याची शर्यत केली जात आहे.
कीड व रोगावरील उपाय
तुडतुडा रोगाच्या नियंत्रणासाठी इमेडॅप्लोप्रिट १७.८ एसएल २.५ एमएल किंवा थायामिथोक्झाम २५ डब्ल्यूजी २.५ ग्रॅम, प्रती १० लिटर पाण्यात मिसळवून फवारणी करावी, जैविक कीटकनाशके उपलब्ध झाल्यास त्यांची फवारणी करावी. तसेच मॅटारिजीयम अॅनिसोक्ली २.५ केजी किंवा म्युकर हॅमिलिक्स २.५ केजी प्रती हेक्टर क्षेत्रावर फवारावे. बेरड रोगाच्या नियंत्रणासाठी फिनॉलफॉस, क्लोरोफायरीफॉस फवारावी. हेक्टरी दीड टन गराडी झाडाचा हिरवा पाला जरी टाकला तरी पीक नियंत्रणात येते. शेतकºयांनी प्रकाश सापड्यांचा वापर करावा. शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, जैविक किड्यांचे निरिक्षण करावे. युरीयाची मात्रा कमी प्रमाणात द्यावी.
कडा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी डायठेन एम ४५, ३० ग्रॅम, सोबत स्ट्रेटोसायक्लिन दीड ग्रॅम, १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. सकाळी व सायंकाळी पिकाची पाहणी करावी. रोग व किटक दिसून आल्यास तत्काळ फवारणी करावी, असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक (कीटकशास्त्र) डॉ. विलास तांबे यांनी केले आहे.
कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घ्या
कीटकनाशकांची फवारणी करताना कपडे, मास्क, गॉगल यांचा वापर करावा. फवारणीसाठी वापरलेले साहित्य स्वच्छ धुवून ठेवावे. फवारणी करताना कीटकनाशकाचा वास घेणे टाळावे. औषधीचे मिश्रण हाताने ढवळू नये. फवारणी करताना तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे. उपाशीपोटी फवारणी करू नये. फवारणीचे काम दरदिवशी आठ तासांपेक्षा जास्त वेळ करू नये. वाऱ्याच्या विरूध्द दिशेने, प्रखर उन्हात फवारणी करू नये. कीटकनाशकाच्या डब्यांवरील मार्गदर्शक चिन्हांकडे लक्ष द्यावे. लाल रंगाचे चिन्ह असलेली औषधी सर्वात जास्त विषारी राहते. त्याचा वापर टाळावा. फवारणी करताना अशक्तपणा, चक्कर येणे, त्वचेची जळजळ होणे, घाम येणे, अंधूक दिसणे, उलटी होणे, मळमळ होणे, छातीत दुखणे आदी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. कीटकनाशके डोळ्यात उडाल्यास पाच मिनिटापर्यंत डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे, असे आवाहन देसाईगंजचे मंडळ कृषी अधिकारी युगेश रणदिवे यांनी केले आहे.