धान पिकावर रोगांचा कहर
By admin | Published: September 17, 2015 01:46 AM2015-09-17T01:46:56+5:302015-09-17T01:46:56+5:30
जिल्ह्यात तुरळक पाऊस होत असताना वातावरणातील बदलाचा परिणाम धान पिकावर होत आहे.
शेतकरी संकटात : बेरडी, करपा, पाने गुंडाळणाऱ्या अळीचा गडचिरोली तालुक्यात प्रादुर्भाव
गडचिरोली : जिल्ह्यात तुरळक पाऊस होत असताना वातावरणातील बदलाचा परिणाम धान पिकावर होत आहे. गडचिरोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये बेरडी, पाने गुंडाळणारी अळी तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव धान पिकावर झाल्याने यावर उपाययोजना करताना शेतकरी संकटात सापडला आहे.
सोनापूर कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने तालुक्यातील अडपल्ली, गोगाव, महादवाडी, कुऱ्हाडी, चुरचुरा, नवरगाव, धुंडेशिवणी, कळमटोला, पिपरटोला, अमिर्झा, चांभार्डा, मरेगाव आदी गावांमध्ये धान पिकाचे सर्वेक्षण करण्यात आले. धान पिकावर बेरडी, पाने गुंडाळणारी अळी, करपा यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने रोवणीची कामेही उशिरापर्यंत आटोपली. परिणामी हलक्या व मध्यम प्रतिच्या धानाची रोवणीची मुदत निघून गेली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रोवणी झाल्याने धान पीक जोमात येऊ शकले नाही. शिवाय तुरळक पाऊस, बदलत्या वातावरणाचा परिणाम धान पिकावर होऊन अनेक किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव धान पिकावर झाला.
गडचिरोली तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी जय श्रीराम, अक्षय, पंकज, कलश, एम. टी. यू १०१०, एम. टी. यू. १०११ आदी धान पीक वाणांची लागवड केली आहे. पीक अधिक जोमात यावे, याकरिता शेतकरी धान पिकाची रोवणी करताना चिखलावर रासायनिक खत व तणनाशक कीटकनाशकांची फवारणी करतात. मात्र फवारणीमुळे अनेकदा वातावरणातील बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव होतो. चिखलणीच्या वेळी नत्र खताचा अधिक वापर झाल्यास किडीचा प्रादुर्भाव होतो. शेतकऱ्यांच्या धान बांधावर मोठी झाडे असल्यास त्यांची नियमित सावली पडून झाडाखालील सावलीमधील धान लुसलुसीत पडतो. अशा ठिकाणी बेरडी व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करून धान पिकावरील कीड नियंत्रण व रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)