ग्रामस्थांच्या रोषानंतर निवड रद्द
By admin | Published: May 26, 2016 02:22 AM2016-05-26T02:22:23+5:302016-05-26T02:22:23+5:30
तालुक्यातील वडेगाव गट ग्राम पंचायतींतर्गत येणाऱ्या धुटीटोला येथील अंगणवाडी सेविका व मदतनिस निवड प्रक्रिया सरपंच, सचिव यांनी हेतुपुरस्सर व ग्रामसभेच्या संमतीशिवाय राबविली.
धुटीटोलावासीयांची पं.स.वर धडक : सरपंच, सचिवाकडून परस्पर सेविका व मदतनिसांची निवड
कुरखेडा : तालुक्यातील वडेगाव गट ग्राम पंचायतींतर्गत येणाऱ्या धुटीटोला येथील अंगणवाडी सेविका व मदतनिस निवड प्रक्रिया सरपंच, सचिव यांनी हेतुपुरस्सर व ग्रामसभेच्या संमतीशिवाय राबविली. स्वमर्जीने खोट्या सह्या घेत निवड प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी पंचायत समितीवर धडक देऊन ठिया आंदोलन केले. ग्रामस्थांचा रोष लक्षात घेऊन प्रशासनाने निवड प्रक्रियेला स्थगिती देत झालेली निवड रद्द करण्याचे आदेश सरपंच व सचिवांना दिले.
धुटीटोला अंगणवाडी केंद्र क्रमांक ३ मधील अंगणवाडी सेविका व केंद्र क्रमांक १ मधील अंगणवाडी मदतनिस यांच्या निवडीसाठी १७ मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सदर सभेची माहिती सरपंच व सचिव यांनी हेतुपुरस्सर सहकारी सदस्य व धुटीटोला येथील ग्रामस्थांना दिली नाही व सभेचा कोरम पूर्ण करण्याकरिता मर्जीतील लोकांच्या खोट्या सह्या घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण केल्याचे दाखविले, असा आरोप धुटीटोला येथील ग्रामस्थांनी १८ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केला व सदर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. मात्र या प्रकरणावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी पंचायत समितीवर धडक देऊन दुपारी १२ वाजेपर्यंत ठिया आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेऊन बालविकास प्रकल्प अधिकारी फुलझेले यांनी निवड प्रक्रिया रद्द झाल्यासंदर्भातील आदेशाची प्रत आंदोलकांना दिली. तसेच आंदोलकांशी या विषयावर सविस्तर चर्चाही केली. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत आंदोलन मागे घेतले.
आंदोलनाचे नेतृत्त्व जि. प. सदस्य निरांजनी चंदेल, नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, पं. स. उपसभापती बबन बुद्धे यांनी केले. यावेळी ग्रा. पं. सदस्य बनस चावर, ब्रह्मकुमार जमकातन, निर्मला चंद्रमा, कैलाश सोंजाल, कैजाबाई बागडेरिया, माजी सरपंच आनंदराव जुमनाके, नरेंद्र तिरणकर, राकेश चव्हाण, मंगरू बन्सोड, भाग्यवान जनबंधू, यशवंत सुकारे, मोहन निनावे, रोहिदास मिरी, नरेंद्र शेंडे, मनिराम जमकातन, ऋषी कुमरे, बोलचंद्र घाटघुमर, बहाल केवास, अतुल जुळा, हिरामण लाडे, सामसाय कोरेटी व धुटीटोला येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
नव्याने घ्या ग्रामसभा
धुटीटोलावासीयांच्या आंदोलनाची व संतप्त ग्रामस्थांची भावना लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करीत अंगणवाडी सेविका व मदतनिसांची निवड प्रक्रिया स्थगित करण्याचे व झालेली निवड रद्द करण्याचे आदेश सरपंच व सचिव यांना दिले. ग्रामसभा आयोजित करून नव्याने निवड प्रक्रिया राबवावी, अशा आशयाची आदेशप्रत आंदोलनकर्त्यांना दिली.