मेडिकल कॉलेजला हुलकावणी? हा तर जनतेशी विश्वासघात; आमदार होळी यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 14:04 IST2022-05-26T13:59:41+5:302022-05-26T14:04:46+5:30
हा गडचिरोली जिल्ह्यातील जनतेचा विश्वासघात असून, जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी याचा विरोध करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. होळी म्हणाले.

मेडिकल कॉलेजला हुलकावणी? हा तर जनतेशी विश्वासघात; आमदार होळी यांचा आरोप
गडचिरोली : गडचिरोलीतील प्रस्तावित मेडिकल कॉलेजला हुलकावणी देऊन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न हा आर्थिक स्वार्थासाठी असून, मेडिकल काॅलेज रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा यासाठी आंदोलन करू, असा इशारा गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिला आहे.
परवा उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सुपरस्पेशालिटी हॉल्पिटलचे सूतोवाच केले होते. मात्र मेडिकल कॉलेजचा कुठेही उल्लेख केला नाही. त्यामुळे हा गडचिरोली जिल्ह्यातील जनतेचा विश्वासघात असून, जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी याचा विरोध करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. होळी म्हणाले.
मेडिकल कॉलेज रद्द करून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी प्रशासनाने, पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना विश्वासात घेतले नाही. वास्तविक जिल्ह्यात मेडिकल कॉलेजची अत्यंत आवश्यकता आहे. त्यानंतर शासनाला वाटेल तर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलही द्यावे, मात्र दृष्टिपथास असलेले मेडिकल कॉलेज रद्द करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मेडिकल कॉलेजच हवे - मेश्राम
गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य माणसाला चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच आधी गरजेचे आहे. कोणत्याही सुपर रुग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालयाएवढी सेवा मिळू शकत नाही. तज्ज्ञ डॉक्टर येतील आणि त्यांची सेवा जिल्ह्यातील रुग्णांना मिळू शकेल. त्यामुळे शासनाने वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा टाळू नये, अशी अपेक्षा माजी जि.प. सदस्य अॅड. राम मेश्राम यांनी व्यक्त केली.