रूग्णांची परवड

By admin | Published: August 3, 2014 12:04 AM2014-08-03T00:04:37+5:302014-08-03T00:04:37+5:30

राज्य शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत दीड लाख रूपयापर्यंत मोफत औषधोपचार करण्याची सोय असली तरी जिल्ह्यात या योजनेंतर्गत नोंदणी असलेले एकच रूग्णालय असल्याने

Disorders of the patients | रूग्णांची परवड

रूग्णांची परवड

Next

जीवनदायी योजना : एकच रूग्णालय; १५०१ लोकांनाच लाभ
दिगांबर जवादे - गडचिरोली
राज्य शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत दीड लाख रूपयापर्यंत मोफत औषधोपचार करण्याची सोय असली तरी जिल्ह्यात या योजनेंतर्गत नोंदणी असलेले एकच रूग्णालय असल्याने राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या रूग्णांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. दोन वर्षात केवळ १५०१ रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
वाढत्या महागाईबरोबरच दवाखान्याचा खर्चही सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचा झाला आहे. तर सरकारी रूग्णालयांचा दर्जा सुमार असल्याने या रूग्णालयात औषधोपचार घेण्यास नागरिक तयार होत नव्हते. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना २ जुलै २०१२ पासून गडचिरोलीसह निवडक ८ जिल्ह्यात सुरू केली. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१३ पासून सदर योजना संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्य शासनाने केशरी, पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांचा ३३३ रूपये प्रति कुटुंब रक्कम भरून विमा काढला आहे. या विम्यांतर्गत सुमारे ९७२ प्रकारच्या आजारांवर नोंदणीकृत खासगी रूग्णालयांमध्ये दीड लाख रूपयापर्यंतच मोफत औषधोपचार करण्यात येते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्याच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मात्र ज्या गडचिरोली जिल्ह्यापासून या योजनेची सुरूवात झाली. तो जिल्हा मात्र उपेक्षितच राहिला आहे.
राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत नोंदणी असलेले सुमारे ४७६ रूग्णालय आहेत. प्रत्येक जिल्ह्यात किमान १० रूग्णालये आढळून येतात. गडचिरोली जिल्ह्यात मात्र गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय हे एकमेव नोंदणीकृत रूग्णालय आहे. गडचिरोली जिल्हा क्षेत्रफळाने बराच मोठा आहे. सिरोंचा, भामरागड, कोरची या तालुक्यातील रूग्णाला शेकडो किमीचे अंतर पार करून गडचिरोली येथे येणे शक्य होत नाही. परिणामी या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या रूग्णांची संख्या सुध्दा कमी असल्याची दिसून येते. दोन वर्षामध्ये केवळ १५०१ रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. इतर जिल्ह्यात मात्र रूग्णांची आकडेवारी ७ हजार ते १५ हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. याचा अर्थ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना अत्यंत कमी लाभ मिळाला असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना या योजनेविषयी फारशी माहिती नसल्याचे दिसून येते.
राजीव गांधी जीवनदायी योजनेत रूग्णालयाचा समावेश होण्यासाठी संबंधित रूग्णालयात ५० खाटांची व्यवस्था असावी. त्यामध्ये अतिदक्षाता विभाग व एमबीबीएस डॉक्टर असावे या अटी आहेत. या अटी अंतर्गत गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालय हे एकमेव रूग्णालय आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक, आर्थिक परिस्थितीचा विचार करून गडचिरोली जिल्ह्यासाठी ही अट शिथील करावी, अशी मागणी होत आहे. जेणे करून आरमोरी, अहेरी, कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयांची या योजनेंतर्गत नोंदणी होऊ शकेल. या तीन रूग्णालयात जीवनदायी योजनेंतर्गतचा लाभ मिळाल्यास लाभार्थ्यांची संख्या आपोआप वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Disorders of the patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.