विस्थापित गुरूजींची दुर्गम भागात नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:14 AM2018-06-18T00:14:50+5:302018-06-18T00:14:50+5:30

बदलीची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्हाभरातील ४१० शिक्षक विस्थापित झाले होते. पाचव्या फेरीत व रॅडम राऊंड घेऊन त्यांची बदली करण्यात आली. यातील ९० टक्केपेक्षा अधिक शिक्षकांना दुर्गम व नक्षलग्रस्त भागातीलच शाळा मिळाल्या आहेत.

Displaced Guruji's appointment in remote areas | विस्थापित गुरूजींची दुर्गम भागात नियुक्ती

विस्थापित गुरूजींची दुर्गम भागात नियुक्ती

Next
ठळक मुद्देबदली प्रक्रिया पूर्ण : एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, धानोरा, कोरची तालुक्यातील मिळाल्या शाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बदलीची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्हाभरातील ४१० शिक्षक विस्थापित झाले होते. पाचव्या फेरीत व रॅडम राऊंड घेऊन त्यांची बदली करण्यात आली. यातील ९० टक्केपेक्षा अधिक शिक्षकांना दुर्गम व नक्षलग्रस्त भागातीलच शाळा मिळाल्या आहेत.
जिल्हा परिषदेत होणारा बदल्यांचा घोळ संपविण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच शासनाने पुणे येथून शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या केल्या. या बदल्यांबाबत काही शिक्षक समाधानी आहेत. तर काही शिक्षक मात्र अन्याय झाल्याचे बोलत आहेत. मे महिन्यात जवळपास दोन हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या. ज्या शिक्षकांनी २० शाळा निवडल्या होत्या, त्यापैकी एकही शाळा न मिळालेल्या शिक्षकांना विस्थापित घोषीत करण्यात आले. या शिक्षकांची बदली करण्यासाठी ११ जून रोजी पाचवी फेरी राबविण्यात आली. तर यातूनही शिल्लक असलेल्या १०८ शिक्षकांसाठी रँडम राऊंड १५ जून रोजी झाला. यातील बहुतांश शिक्षकांना भामरागड, कोरची, सिरोंचा, एटापल्ली, धानोरा तालुक्यातील दुर्गम भागातीलच शाळा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे, विस्थापित झालेल्यांपैकी काही शिक्षक यापूर्वीही दुर्गम भागातच सेवा देत होते. तरीही त्यांची बदली दुर्गम भागातच झाली असल्याने सदर शिक्षक आपल्यावर अन्याय झाला असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. यासाठी लढा देण्याचा निर्धार शिक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. तोपर्यंत मात्र बदली झालेल्या ठिकाणी रूजू व्हावेच लागणार आहे.
यादीसाठी माहितीचा अधिकार
बदली झालेल्या शिक्षकांची यादी संवर्गनिहाय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माहितीच्या अधिकारांतर्गत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. शिक्षण विभागानेही याला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित गट शिक्षणाधिकाºयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली माहिती द्यावी, असे निर्देश दिले आहेत. ही यादी उपलब्ध झाल्यानंतर बोगस माहितीच्या आधारे बदली झालेल्यांचा भंडाफोड होणार आहे.
प्रमाणपत्रांची तपासणी सुरूच
संवर्ग १ व संवर्ग २ मधून ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत, त्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत केली जात आहे. सदर प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली होती. ती प्रक्रिया अजुनही सुरूच आहे. त्यामुळे नेमक्या किती शिक्षकांचे प्रमाणपत्र बोगस आढळले, हे अजूनपर्यंत कळले नाही. गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत होणाºया प्रमाणपत्रांच्या तपासणीवर काही शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे. काही शिक्षकांनी प्रकृतीचे कारण दाखवून संवर्ग १ मधून बदलीचा लाभ उचलला आहे. मात्र वैद्यकीय प्रमाणपत्र गट शिक्षणाधिकाºयांना समजणार नाही. यासाठी जबाबदार वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सदर प्रमाणपत्रांची तपासणी करून घ्यावी. त्यानंतरच संबंधित शिक्षकाचे प्रमाणपत्र योग्य आहे किंवा नाही, याबाबतचा निर्णय घ्यावा. दोषी आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
च्इतर जिल्ह्यांमध्ये प्रमाणपत्र तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरून बदलीचा लाभ उचलला आहे, अशा शिक्षकांवर कारवाई करण्याचीही तयारी संबंधित जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरू केली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे अजूनपर्यंत अहवालच उपलब्ध झाला नाही. तपासणीची प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
 

Web Title: Displaced Guruji's appointment in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.