चौकाच्या नामफलकावरून दोन गटांत वाद
By Admin | Published: May 29, 2016 01:32 AM2016-05-29T01:32:42+5:302016-05-29T01:32:42+5:30
शहरातील गांधी वॉर्डात महात्मा गांधी विद्यालयाजवळील नवीन वसाहतीत चौकाच्या नामफलकावरून दोन गटांत वाद..
गांधी वॉर्डातील स्थिती : अवैध नामफलक
देसाईगंज : शहरातील गांधी वॉर्डात महात्मा गांधी विद्यालयाजवळील नवीन वसाहतीत चौकाच्या नामफलकावरून दोन गटांत वाद निर्माण झाला असून यामुळे तणावाची परिस्थिती तयार झाली आहे.
रेल्वेच्या मागे असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाला लागून नवीन वसाहत वसली आहे. चौकाचे नामफलक लावण्यासाठी २० घरांमधील नागरिकांनी ७ मे ला नगर पालिकेला निवेदन दिले. व अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर ओमशांती कॉलनी असे नामफलकाचे विमोचन केले. त्यानंतर आणखी ४० ते ५० नागरिकांनी १३ मे रोजी ठराव घेऊन २५ मे रोजी आनंदनगर नावाचे नामफलक लावले व जुने नामफलक उद्ध्वस्त केले. या नामफलकांवरून दोन्ही गटात तणाव निर्माण झाला आहे.
गांधी वॉर्डातील नामफलक प्रकरण पोलीस स्टेशन व नगर परिषदेपर्यंत पोहोचले आहे. देसाईगंज नगर पालिकेतील १७ वॉर्ड अधिकृत नावानुसार ओळखले जात असताना वॉर्डात अनेक ठिकाणी स्वमर्जीने नागरिकांनी बेकायदेशीरपणे अनाधिकृत नामफलक लावले आहेत. मतदारांचा रोष ओढू नये यासाठी नगरसेवकही अशा नामफलकांना पाठिंबा देत असल्याचे उघड झाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगर पालिका क्षेत्रात अशा प्रकारचे बेकायदेशीर नामफलक लावता येत नाही. अशा नामफलकांवर कारवाई करणे आवश्यक असतानाही नगर पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. नगर पालिकेच्या परवानगीशिवाय फलक लावले जात असल्याने हे फलक लावण्याची स्पर्धा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांनी कठोर पाऊल उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.