सर्वसाधारण क्षेत्रातील २० गावांबाबत आक्षेप
By admin | Published: May 24, 2017 12:31 AM2017-05-24T00:31:37+5:302017-05-24T00:31:37+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या करताना यावर्षीपासून पहिल्यांदाच गावांची अवघड व सर्वसाधारण या दोन भागात विभागणी करण्यात आली आहे.
अंतिम निर्णयाकडे लक्ष : अवघड क्षेत्रात टाकण्यासाठी अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या करताना यावर्षीपासून पहिल्यांदाच गावांची अवघड व सर्वसाधारण या दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील एकूण १ हजार ५३६ गावांपैकी ८९१ गावे अवघड क्षेत्रात तर ६४५ गावे सर्वसाधारण क्षेत्रात टाकली होती. यापैकी २० गावांबाबत शिक्षकांनी आक्षेप नोंदविले आहेत. या आक्षेपांवर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळा दुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र या शाळांमध्ये अध्यापन करण्यास शिक्षक तयार होत नसल्याने दरवर्षी शिक्षकांच्या बदल्यांदरम्यान राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये मोठा गोंधळ उडत होता. या सर्व प्रकाराला आळा बसण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच शासनाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्ह्यातील गावांचे अवघड व सर्वसाधारण या दोन भागात विभाजन करण्याचे निर्देश दिले. जे क्षेत्र तालुका मुख्यालयापासून दूर आहे. दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहोचण्यास सोयीसुविधा नाही. दुर्गम व डोंगराळ भागातील गावांना अवघड क्षेत्र म्हणून जाहीर करावे. तर हे क्षेत्र वगळता इतर क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रात टाकण्याचे निर्देश देण्यात आले. शिक्षण विभागाने मागील दोन महिन्यांपासून विविध विभागाकडून माहिती मागितली. त्या माहितीवरून जिल्हा परिषदेने ६४५ गावे सर्वसाधारण क्षेत्रात मोडतात. तर ८९१ गावे अवघड क्षेत्रात मोडत असल्याचे जाहीर केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, कोरची हे तालुके जंगलांनी व्यापलेले आहेत. या तालुक्यांमध्ये नक्षलवादाची समस्या आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील सर्वच गावे अवघड क्षेत्रात टाकण्यात आली आहेत. तर आरमोरी, देसाईगंज या तालुक्यांमधील सर्वच गावे सर्वसाधारण क्षेत्रात टाकण्यात आली आहेत.
सर्वसाधारण व अवघड क्षेत्र जाहीर झाल्यानंतर यावर आक्षेप नोंदविण्याचे अधिकार शिक्षक व शिक्षक संघटनांना देण्यात आले होते. त्यानुसार शिक्षकांनी २० गावांबाबत आक्षेप नोंदविला आहे. शिक्षण विभागाने शिक्षकांचे संबंधित अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. अवघड व सर्वसाधारण क्षेत्रासंदर्भात शासनाने जो निर्णय घेतला आहे. त्यामध्ये शिक्षकांकडून अर्ज मागविण्याची तरतूद आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा राहणार आहे. यावर्षी तयार झालेली गावांची यादी भविष्यातही कायम राहणार आहे. या यादीनुसारच भविष्यात शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे या यादीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षकांच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी किती गावे अवघडमध्ये टाकतात व किती गावे सर्वसाधारणमध्ये टाकतात याकडे जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचे लक्ष लागले आहे.
बदली झालेले १२ शिक्षक भारमुक्त
फेब्रुवारी महिन्यात आंतर जिल्हा बदलीने ज्या शिक्षकांची बदली झाली होती. अशा १२ शिक्षकांना गडचिरोली जिल्हा परिषदेने नुकतेच भारमुक्त केले आहे. सदर बदल्या आपसी स्वरूपाच्या राहत असल्याने गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत सेवा देणाऱ्या १२ शिक्षकांची त्यांच्या स्वजिल्ह्यात बदली झाली आहे. तर त्याच जिल्ह्यांमधून गडचिरोली जिल्ह्यात १२ शिक्षक रूजू होणार आहेत. त्यामुळे मूळचे गडचिरोली जिल्ह्यातील असलेल्या शिक्षकांना या जिल्ह्यात सेवा देण्यास संधी मिळणार आहे.
यावर्षीपासून आंतर जिल्हा बदलीचे अर्ज आॅनलाईन झाले आहेत. यामुळे शिक्षकांचा बराच खर्च श्रम वाचण्यास मदत झाली आहे. अनेक शिक्षकांचे अर्ज भरून झाले नव्हते. त्यामुळे आंतर जिल्हा बदलीसाठी अर्ज करण्यास २५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.