जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांमध्ये नाराजीचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:23 AM2021-07-19T04:23:50+5:302021-07-19T04:23:50+5:30
स्थानिक विश्रामभवनात नवनियुक्त सदस्यांची रविवारी (दि.१८) बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, ॲड. राम मेश्राम, शिवसेनेचे ...
स्थानिक विश्रामभवनात नवनियुक्त सदस्यांची रविवारी (दि.१८) बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, ॲड. राम मेश्राम, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आणि माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, तसेच जीवन नाट, कल्पना तिजारे, युनूस शेख, राजू अंबानी आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक झाली नाही. त्यामुळे नवनियुक्त डीपीसीच्या सदस्यांना जिल्ह्याच्या नियोजनात आपले योगदान देण्याची संधीच मिळाली नाही. यादरम्यान या सदस्यांनी सुचविलेल्या काही मुद्द्यांचाही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा नियोजन विभागाचे अधिकारी चुकीचे नियोजन करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्याचे नियोजन परस्पर सुरू असून, सदस्यांना विचारात घेतले जात नाही. वास्तविक डीपीसी सदस्य आणि लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे करावीत, तसेच डीपीसी सदस्यांचा लघुगट तयार करून बैठकीच्या आधी या गटाची एक बैठक आयोजित करावी, यावरही या बैठकीत चर्चा झाली. सदस्यांनी आपली ही नाराजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याचे सांगितले.