दारू, तंबाखू मुक्तीतूनच रोगमुक्ती शक्य
By admin | Published: January 7, 2016 01:56 AM2016-01-07T01:56:12+5:302016-01-07T02:02:42+5:30
प्रदूषण, तंबाखू व दारूचे व्यसन ही तीन रोगांची प्रमुख कारणे आहेत. तंबाखू, दारू सेवनामुळे वयस्कर...
गडचिरोली : प्रदूषण, तंबाखू व दारूचे व्यसन ही तीन रोगांची प्रमुख कारणे आहेत. तंबाखू, दारू सेवनामुळे वयस्कर माणसामध्ये लकवा, हृदयरोग, श्वसन, फुफ्फुसाचे रोग तसेच तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उच्च रक्तदाब व मधुमेह तसेच कॅन्सर हे रोग कितीही औषधोपचार केला तरी कायमस्वरूपी दुरूस्त होत नाही. गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू व दारू व्यसनाचे प्रमाण अधिक असल्याने येथे आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तंबाखू व दारूमुक्तीतूनच रोगमुक्ती शक्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग यांनी केले.
शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याची जबाबदारी सरकारची - किलोर
भारतीय संविधानाने सन्मानाचे व चांगले जीवन जगण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार व हक्क बहाल केला आहे. यात आरोग्याचा मोठा सहभाग आहे. गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टर व औषधींची कमतरता असल्यामुळे मोठी आरोग्य समस्या आहे. जिल्ह्यातील शेवटच्या माणसापर्यंत परिपूर्ण आरोग्य सेवा पोहोचविण्याची राज्य सरकारची संविधानिक जबाबदारी आहे. ती सरकारने योग्यरित्या बजावावी, असे अॅड. अनिल किलोर यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात वनौषधीवर आधारित रिसर्च होण्यासाठी संशोधन केंद्र स्थापन व्हावेत, तसेच येथे आयुर्वेदिक दवाखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असेही अॅड. किलोर यावेळी म्हणाले.
जिल्हा जंगल कामगार सहकारी संघ गडचिरोली व डॉ. गिल्लुरकर हॉस्पिटल नागपूरच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी येथील जंकासं कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. अभय बंग बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जनमंच संस्था नागपूरचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जंकासं नागपूरचे अध्यक्ष वासुदेवशाहा टेकाम, प्रभारी जिल्हा उपनिबंधक एम. एल. गणवीर, नागपूरचे मधुमेह रोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर, माजी आ. हरिराम वरखडे, घनश्याम मडावी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. बंग म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात ८० हजार मोटार सायकल आहेत. युवकांकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी अपघात जिल्ह्यात होत आहेत. अनेकांना यात आपला जीव गमवावा लागला. गडचिरोली तालुक्यातील खुर्सा गावात गेल्या दोन वर्षांपासून दारू १०० टक्के बंद आहे. तसेच वर्षभरापासून तंबाखू व खर्रा बंद आहे. तसेच घोट परिसरातील गरंजी हे गाव गेल्या सहा महिन्यांपासून १०० टक्के दारू व तंबाखूमुक्त झाले आहे. जंकासं संस्थांनी दारू व तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न करून निरोगी समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.