वीज मीटर लावण्यास दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:25 AM2018-06-07T01:25:38+5:302018-06-07T01:25:38+5:30
वीज वितरण कंपनीच्या ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे कोरची येथे कार्यालय आहे. कोरची तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी नव्या वीज मीटरसाठी या कार्यालयाकडे अर्ज सादर केले आहे. याला महिनाभराचा कालावधी उलटला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : वीज वितरण कंपनीच्या ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे कोरची येथे कार्यालय आहे. कोरची तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी नव्या वीज मीटरसाठी या कार्यालयाकडे अर्ज सादर केले आहे. याला महिनाभराचा कालावधी उलटला आहे. मात्र महावितरणकडून संबंधित ग्राहकांना नवीन वीज मीटर अद्यापही लावून देण्यात आले नाही. परिणामी ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहे. विशेष म्हणजे, महावितरणच्या सदर कार्यालयात महिनाभरापासून वीज मीटरबाबतचे नागरिकांचे अर्ज धूळखात पडले आहे.
सदर गंभीर प्रकाराकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. ही समस्या माहित झाल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने महावितरणच्या सदर कार्यालयात ४ जून रोजी प्रत्यक्ष भेट देऊन वस्तूस्थिती जाणून घेतली. यावेळी येथील अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले. वीज मीटरसाठी अर्ज केल्याला एक महिना उलटला आहे. मात्र वीज मीटर लावून देण्यात आले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी मोटार तसेच इतर सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे, असे कार्यालयात आलेल्या अनेक नागरिकांनी सांगितले. महावितरणचे अधिकारी ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने प्रचंड त्रास होत असल्याचे अनेक ग्राहकांनी सांगितले. अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांचे काम खोळंबत आहे.
विद्युत तारांजवळील झाडांच्या फांद्या कायम
गोंदिया जिल्ह्याच्या आमगावमार्गे जंगलातून कोरची येथे विद्युत पुरवठा होतो. वादळी पावसाने वीज खांब कोसळून तसेच तारा तुटून आठ ते दहा दिवस अनेकदा वीज पुरवठा खंडीत राहतो. दरवर्षी पावसाळ्याच्या एक महिन्यापूर्वी विद्युत तारानजीकच्या फांद्या तोडल्या जात होत्या. मात्र यावेळी झाडालगतच्या वाढलेल्या फांद्या तारानजीक कायम आहे. परिणामी वादळामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाºया प्रकाराबाबत वीज ग्राहकांनी अधिकाºयाप्रती नाराजी व्यक्त केली आहे.