गरीब शालेय मुलींना मोफत सायकल वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:23 AM2021-07-05T04:23:05+5:302021-07-05T04:23:05+5:30
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा उपपाेलीस स्टेशन अंतर्गत एकूण १३ गावे येत असून ती अतिदुर्गम भागात आहेत. प्रत्येक गावात माध्यमिक ...
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा उपपाेलीस स्टेशन अंतर्गत एकूण १३ गावे येत असून ती अतिदुर्गम भागात आहेत. प्रत्येक गावात माध्यमिक शाळेची सोय नसल्याने या दुर्गम भागातील मुले व मुली जिमलगट्टा येथे शालेय शिक्षणासाठी येत असतात. त्यावेळी या विद्यार्थ्यांना ये-जा करणे सोयीचे व्हावे, घरातील गरीब परिस्थितीमुळे पायदळ यावे लागते ही बाब जिमलगट्टा येथील प्रभारी अधिकारी देवानंद बगामारे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी मेटे, राहुल फड, सागर देवकर यांच्या लक्षात आले. तेव्हा अधिकारी वर्गांनी व अंमलदार यांनी या दुर्गम भागातील गरजू व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या दुर्बल कुटुंबातील परिसरातील १५ शालेय मुलींना मोफत सायकल वाटप करण्याचे ठरविले.
३० जून रोजी पोलीस स्टेशन जिमलगट्टा येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने व मार्गदर्शनाखाली ठाण्याअंतर्गत येत असलेल्या रसपेल्ली, मेडपेली, पतीगाव, किष्टापूर, वेडपेली, अर्कापेली, येडरंगा आदी गावातील गरीब शालेय १५ मुलींची निवड करून त्यांना पाेलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त साहाय्याने मोफत सायकल उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच पंकज तलांडे, मुकुंद दुर्गे, प्रभारी अधिकारी देवानंद बगमारे, पाेलीस उपनिरीक्षक बालाजी मेटे, राहुल फड, सागर देवकर, एसआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे, पोलीस कर्मचारी तसेच गावातील नागरिक हजर होते.