जिल्ह्यातील २० पाणी पुरवठा योजना नादुरूस्त
By admin | Published: May 22, 2014 11:54 PM2014-05-22T23:54:44+5:302014-05-22T23:54:44+5:30
गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत २० गावातील पाणी पुरवठा योजना नादुरूस्त असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये मुलचेरा तालुक्यातील ३, अहेरी तालुक्यातील ६, सिरोंचा
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत २० गावातील पाणी पुरवठा योजना नादुरूस्त असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये मुलचेरा तालुक्यातील ३, अहेरी तालुक्यातील ६, सिरोंचा तालुक्यातील ५, एटापल्ली तालुक्यातील २, भामरागड तालुक्यातील १ व कुरखेडा तालुक्यातील ३ पाणी पुरवठा योजना नादुरूस्त होऊन बंद पडल्या आहेत. मुलचेरा तालुक्यात येल्ला, विवेकानंदपूर, मुलचेरा, अहेरी तालुक्यातील ८ पैकी ६ पाणी पुरवठा योजना बंद आहे. सिरोंचा तालुक्यातील १५ पैकी ५ पाणी पुरवठा योजना बंद आहे. येथे वीज बिल न भरल्याने चार योजना बंद आहेत. एटापल्ली तालुक्यात दोन योजना नादुरूस्त होऊन बंद पडल्या आहेत. यामध्ये कसनसूर गेदा येथील पाणीपुरवठा योजनेचा समावेश आहे. तेथे वीज पुरवठा नसल्याने त्या बंद आहेत. भामरागड तालुक्यातील लाहेरीची पाणी पुरवठा योजना बंद आहे. तर कुरखेडा उपविभागात वासाळा, नान्ही, देलनवाडी या पाणी पुरवठा योजना बंद आहेत. आरमोरी तालुक्यातील देऊळगाव पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे. गडचिरोली तालुक्यातील कोटगल, पारडी या पाणी पुरवठा योजनेचे कामही अपुर्ण आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना सार्वजनिक विहिरी व हातपंपावरून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे. तर अनेक गावातील लोक गावातील हातपंपही नादुरूस्त असल्याने लांब अंतरावर येऊन पाणी घेऊन जात आहे. प्रशासनाचे गावातील पाणी टंचाईच्या प्रश्नाकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. आचार संहितेमुळेसुध्दा अनेक अडचणी आहेत. (प्रतिनिधी)