६८ हजार आरोग्यपत्रिका वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:30 AM2018-07-08T00:30:04+5:302018-07-08T00:30:47+5:30
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत २०१७-१८ या वर्षात जिल्हाभरातील ८०५ गावांमधील १९ हजार ९७३ मृद नमुने गोळा करण्यात आले. त्यांची तपासणी करून त्या अंतर्गत येणाऱ्या ६८ हजार ३१ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत २०१७-१८ या वर्षात जिल्हाभरातील ८०५ गावांमधील १९ हजार ९७३ मृद नमुने गोळा करण्यात आले. त्यांची तपासणी करून त्या अंतर्गत येणाऱ्या ६८ हजार ३१ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले आहे.
पिकांची निवड करण्यासाठी तसेच पिकांना खतांची मात्रा देताना संबंधित जमिनीमध्ये नेमके कोणते घटक आहेत. याची माहिती संबंधित शेतकऱ्याला असणे आवश्यक आहे. मातीमध्ये अगोदरच उपलब्ध असलेल्या घटकानुसार खताचे नियोजन केल्यास खताचा अपव्यय टाळता येतो. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होते. प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीतील द्रव्यांची तपासणी व्हावी, या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत संबंधित क्षेत्राचे कृषी सहायक जमिनीतील नमुने गोळा करतात. बागायती क्षेत्र असेल तर २.५ हेक्टर व जिरायत क्षेत्र असेल तर १० हेक्टर जमिनीमागे एक नमुना घेतला जातो. सदर मातीचा नमुना तपासणीसाठी गडचिरोली येथील जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी कार्यालयात पाठविल्या जातो. नमुन्याची तपासणी केल्यानंतर संबंधित क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीची आरोग्य पत्रिका तयार केली जाते. ही आरोग्य पत्रिका कृषी सहायकाच्या मार्फत पुन्हा शेतकºयांना वितरित केली जाते.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६५० गावे आहेत. त्यापैकी दरवर्षी जवळपास निम्म्या गावांमधील मातीचे नमुने तपासले जातात. म्हणजेच दर दोन वर्षाने प्रत्येक गावातील मातीचे नमूने तपासले जातात. २०१७-१८ या वर्षात १९ हजार ७४४ मृद नमुने तपासण्याचे उद्दिष्ट जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी कार्यालयाने ठेवले होते. या वर्षात एकूण १९ हजार ९७३ नमुने गोळा करण्यात आले. हे सर्वच नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. या क्षेत्रांतर्गत येत असलेल्या ६८ हजार ३१ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय शाश्वत शेती अंतर्गत ३१ गट तयार झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या शेतीचे ६७५ मृद नमुने तपासून संबंधित शेतकºयांना आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आलया आहेत.
जिल्ह्यातील जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण कमी
गडचिरोली जिल्ह्यातील जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण कमी तर स्फुरद व पालाशचे प्रमाण मध्यम प्रमाणात आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना पीक घेताना नत्राचे प्रमाण अधिक द्यावे लागेल. तर स्फुरद व पालाश मध्यम प्रमाणात द्यावे लागेल. या सर्व बाबी संबंधित मातीचे नमूने तपासल्यानंतरच लक्षात येतात. त्यामुळे मृद नमुने तपासणे आवश्यक आहे.
सर्वसाधारण नमुन्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश तपासले जातात. तर सुक्ष्म नमुन्यामध्ये जस्त, गंधक, बोराण, लोह, कॅल्शीअम, मॅग्नेशीअम आदी घटकद्रव्य किती प्रमाणात आहेत, हे सुध्दा तपासले जाते. विशिष्ट पीक घ्यायची असेल तर सुक्ष्म नमुना घेतला जातो. सुक्ष्म नमुन्यात प्रत्येक घटकाची माहिती येत असल्याने जमिनीची पूर्ण माहिती मिळते.
मृद तपासणीमुळे संबंधित शेतकऱ्याच्या शेतात नेमके कोणते घटकद्रव्य आहेत, हे कळण्यास मदत होते. शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्यपत्रिका दिल्या जातात. त्यावर खत वापराबाबत सूचना दिल्या जातात. विशेष म्हणजे, गहू, धान, हरभरा, सोयाबिन, कापूस, तूर या पिकांच्या खताचे नियोजन कसे करावे याची माहिती दिली राहते. आरोग्य पत्रिकेतील मार्गदर्शक सूचनांनुसार खताचे नियोजन केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होईल.
- निलेश सुपारे,
जिल्हा मृद सर्वेक्षण, मृद चाचणी अधिकारी, गडचिरोली