पूरग्रस्तांना पालकमंत्र्यांकडून अन्नधान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 11:54 PM2018-08-23T23:54:49+5:302018-08-23T23:55:28+5:30
अतिवृष्टीने संसार उद्ध्वस्त झालेल्या आलापल्ली येथील २०० कुटुंबांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडून एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य मदत म्हणून देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अतिवृष्टीने संसार उद्ध्वस्त झालेल्या आलापल्ली येथील २०० कुटुंबांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडून एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य मदत म्हणून देण्यात आले.
चार दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. पुराचे पाणी अहेरी, आलापल्ली व ग्रामीण भागातील काही नागरिकांच्या घरामध्ये शिरले होते. अचानक पाण्याचा वेढा झाला. त्याचबरोबर पूर आला, त्या दिवशी रात्रंदिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातील साहित्य बाहेर काढणे शक्य झाले नाही. परिणामी घरातील साहित्य व दैनंदिन वापराच्या वस्तू पुरामध्ये बुडाल्या. पाण्यामुळे अन्नधान्य खराब झाल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळणार असले तरी ही मदत मिळण्यासाठी बराच कालावधी आहे. पूरग्रस्त कुटुंब उपाशी राहू नये, ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी स्वखर्चातून आलापल्ली येथील पूरग्रस्तांना महिनाभर पुरेल एवढे तांदूळ, डाळ, तेल उपलब्ध वितरित केले. या मदतीमुळे सदर कुटुंबांना एक महिना सावरण्यास मदत होणार आहे.
मदतीचे वितरण करतेवेळी अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, प्रकाश गुडेल्लीवार, भाजपा अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजपा युवा मोर्चा, जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, अहेरी शहर अध्यक्ष मुकेश नामेवार, आलापल्ली शहर अध्यक्ष नागेश रेड्डी, फिरोज शेख, सलिम शेख, सागर डेकाटे, विनोद ठाकरे, पप्पू मदिवार, शंकर मगडीवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, मालू तोडसाम, गुड्डू ठाकरे, संदीप गुमुलवार उपस्थित होते.